आयपीएल स्पर्धा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते खेळाडूंवर लावल्या जाणाऱ्या कोट्यवधींच्या बोली, स्पॉन्सर्सच्या माध्यमातून होणारी कोट्यवधींची उलाढाल, रोजच्या सामन्यातली रंगत आणि अनेक गोष्टी…भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने यंदा आयपीएलचं आयोजन युएईत केलं. VIVO या चिनी मोबाईल कंपनीला होणारा विरोध लक्षात घेता बीसीसीआयने एका वर्षासाठी करार स्थगित करत Dream 11 या मोबाईल अॅपची स्पॉन्सरशीप स्विकारली. या हंगामासाठी Dream 11 ने बीसीसीआयला २२२ कोटी रुपये मोजले आहेत. याव्यतिरीक्त Unacademy आणि Cred या दोन ब्रँड्सनाही BCCI ने स्पॉन्सर्सशीपचे हक्क देत प्रत्येकी ८० कोटींचा निधी घेतला. याव्यतिरीक्त आयपीएल सामन्यांमध्ये आणखी एक घटक असतो ज्याला मानधनात लाखो रुपये मिळतात. तो घटक म्हणजे पंच…

आयपीएलच्या यंदाच्या हंगामासाठी बीसीसीआयने भारतीय पंचांसोबत आयसीसीच्या एलिट पॅनलमधील ४ पंचांची मदत घेतली होती. आयपीएलमध्ये पंचांचं मानधन Paytm ही कंपनी करत असून त्यांना हंगामाच्या शेवटी एकत्रित ७ लाख ३३ हजार रुपये मानधन स्वरुपात दिले जातात. याव्यतिरीक्त आयसीसीच्या एलिट पॅनलमधील पंचांना प्रत्येक सामन्यासाठी १ लाख ९८ हजार तर इतर पंचांना ५९ हजाराची रक्कम मिळते. यंदाच्या स्पर्धेत रिचर्ड इलिंगवर्थ, पॉल रॅफेल, ख्रिस गॅफनी आणि नितीन मेनन हे चार एलिट पॅनलमधील पंच काम करत आहेत.

याव्यतिरीक्त भारताकडून अनिल चौधरी, सी. समशुद्दीन, विरेंद्र शर्मा, के.एन. अनंतपद्मनाभन, एस.रवी, विनीत कुलकर्णी, यशवंत बर्डे, उल्हास गंधे, अनिल दांडेकर, के. श्रीनीवासन आणि पश्चिम पाठक हे पंच काम करत आहेत.