Jason Roy rejects Los Angeles Knight Riders offer: इंग्लंडचा स्टार फलंदाज जेसन रॉय अमेरिकेत होणार्या मेजर प्रीमियर लीगमध्ये खेळणार असल्याने वाद निर्माण झाला होता. पण आता जेसन रॉयच्या एका सोशल मीडिया पोस्टनंतर हा वाद मिटल्याचे दिसत आहे. खरेतर, जेसन रॉयबद्दल असे वृत्त होते की त्याने मेजर प्रीमियर लीगमध्ये लॉस एंजेलिस नाइट रायडर्ससोबत खेळण्यासाठी आपल्या देशाच्या केंद्रीय करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु रॉयने असे सर्व वृत्त फेटाळून लावले आहे.
जेसन फक्त इंग्लंडसाठीच क्रिकेट खेळणार आहे –
रात्री उशिरा जेसन रॉयने एका दीर्घ सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्ट केले की, तो लीग क्रिकेटपेक्षा आपल्या देशाला प्राधान्य देईल. तसेच अजून अनेक वर्षे इंग्लंडसाठी क्रिकेट खेळत राहील. जेसन रॉयने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या काही अटकळानंतर मी हे स्पष्ट करू इच्छितो की, मी इंग्लंडमधून कुठेही जात नाही आणि कधीही जाणार नाही.”
देशाचे प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची गोष्ट –
जेसन रॉय त्याच्या पोस्टमध्ये पुढे म्हणाला, “व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून मला माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा अभिमान वाटतो आणि पुढेही करत राहीन. मी आणखी काही वर्षे इंग्लंडसाठी क्रिकेट खेळण्याची आशा करतो आणि तीच माझी प्राथमिकता आहे. मेजर लीग क्रिकेटमध्ये सहभागी होण्याबाबत माझी ईसीबीशी स्पष्ट चर्चा झाली आहे. जोपर्यंत कराराच्या उर्वरित वर्षासाठी मला पैसे द्यावे लागत नाहीत तोपर्यंत ईसीबी मी या स्पर्धेत खेळल्या असल्याने आनंदी होते.”
विश्वचषक जवळ आला आहे –
जेसन रॉय पुढे म्हणाला की, “मला कोणत्याही केंद्रीय कराराशिवाय अमेरिकेत होणार्या या लीगचा भाग व्हायचे होते, कारण त्यावेळी इंग्लंडसोबतच्या कोणत्याही वेळापत्रकात अडचणी येत नव्हत्या. इंग्लंडचा खेळाडू म्हणून स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्याचा मला फायदा होतो. त्यामुळे साहजिकच माझे प्राधान्य इंग्लंड क्रिकेटला आहे, विशेषत: विश्वचषक जवळ आल्यावर. हा केवळ माझ्यासाठीच नाही तर कोणत्याही खेळाडूसाठी मोठा सन्मान आहे.”
जेसन रॉय आयपीएल खेळून मायदेशी परतला –
जेसन रॉय अलीकडेच केकेआर संघासाठी भारतात आयपीएल स्पर्धा खेळत होता. परंतु आता तो मायदेशी परतला आहे. आयपीएल २०२३ मध्ये शाकिब अल हसन जखमी झाल्यानंतर जेसन रॉयचा समावेश करण्यात आला होता. या हंगामात, रॉयने केकेआरसाठी ८ सामने खेळले आणि ३५.६३ च्या सरासरीने २८५ धावा केल्या. यादरम्यान त्याने २ अर्धशतकेही झळकावली. आयपीएल २०२३ मध्ये रॉयचा स्ट्राइक रेट १५१.६० होता.