ईडन गार्डन्सवरील आयपीएल क्रिकेट स्पध्रेच्या अखेरच्या साखळी सामन्याने क्रिकेटरसिकांना थरारक लढतीची अनुभूती दिली. अनुरित सिंगच्या २०व्या षटकातील पाचव्या चेंडूवर सुनील नरिनने लेग बाइज स्वरूपात एकेरी धाव मिळवली आणि कोलकाता नाइट रायडर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर एक विकेट आणि एक चेंडू राखून रोमहर्षक विजय मिळवला. कोलकाताने १२व्या सामन्यातील सातव्या विजयासह १५ गुणांसह आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थान काबीज केले आहे.
पंजाबच्या १८४ धावांचे लक्ष्य पेलताना कोलकाताकडून आंद्रे रसेलने २१ चेंडूंत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ५१ धावांची खेळी साकारून या विजयाची पायाभरणी केली. रसेल आणि युसूफ पठाण (२९) यांनी पाचव्या विकेटसाठी ५३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. ४ बाद १३६ अशा सुस्थितीनंतर मात्र कोलकाताची घसरगुंडी उडाली आणि ९ बाद १८३ अशी अवस्था झाली. अनुरितच्या अखेरच्या षटकात कोलकाताला ८ धावांची आवश्यकता होती, पण दुसऱ्याच चेंडूवर ब्रॅड हॉग (५) धावचीत झाला. मग तिसऱ्या चेंडूवर पीयूष चावलाने डीप मिडविकेटला षटकार खेचून पुन्हा सामन्याचे पारडे कोलकाताकडे झुकवले. मात्र चौथ्याच चेंडूवर पीयूष (१८) यष्टीरक्षक वृद्धिमान साहाकडे झेल देऊन बाद झाला आणि पंजाबच्या आशा पुन्हा जिवंत झाल्या. मग पाचव्या चेंडूवर नरिनने हिमतीने विजय मिळवून दिला.
त्याआधी, मॅक्सवेलने २२ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४३ धावांची खेळी साकारल्यामुळे पंजाबला प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १८३ धावा करता आल्या. कोलकाताच्या सुनील नरिनने १९ धावांत ४ बळी घेत पंजाबवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला.
संक्षिप्त धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ५ बाद १८३ (ग्लेन मॅक्सवेल ४३, मनन व्होरा
३९; सुनील नरिन ४/१९) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : १९.५ षटकांत ९ बाद १८४
(आंद्रे रसेल ५१, युसूफ पठाण २९, गौतम गंभीर २४; गुरकिराट सिंग २/१७,
अनुरित सिंग २/५६)
सामनावीर : आंद्रे रसेल.