दमदार सांघिक प्रदर्शन, जुन्या खेळाडूंची बदललेली भूमिका आणि श्रेयस अय्यरचं यशस्वी नेतृत्व या त्रिसुत्रीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने दशकभरानंतर आयपीएल जेतेपदावर कब्जा केला. गेल्या वर्षी कोलकाताला सातव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. कोलकाताने चंद्रकांत पंडित यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली. विदर्भ आणि मध्य प्रदेश संघांना रणजी करंडक मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. कोलकाता प्रशिक्षकपदी त्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय किती योग्य होता हे दिसून आलं. कोलकाताने याआधी २०१२ आणि २०१४ मध्ये जेतेपदावर नाव कोरलं होतं. गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाताने हे यश मिळवलं होतं. युवा खेळाडूंशी संवाद-समन्वयन, संघ व्यवस्थापन आणि आयपीएल स्पर्धेचा अनुभव यामुळे गंभीर डगआऊटमध्ये असणं कोलकातासाठी अतिशय फायदेशीर ठरलं. अभिषेक नायर कोलकाता संघाचा आधारवड आहेत. कोलकाता संघाची फलंदाजी बघता अभिषेक यांची भूमिका किती निर्णायक आहे ते लक्षात येतं.

नरायण-सॉल्ट बिनीची जोडी
ट्वेन्टी२० सामन्यात पॉवरप्लेची ६ षटकं निर्णायक ठरू शकतात हे लक्षात घेऊन कोलकाताने यंदाच्या हंगामात महत्त्वपूर्ण बदल केले. याआधीच्या दोन हंगांमांमध्ये कोलकाता प्रत्येक सामन्यात सलामीची जोडी बदलत असे. यंदा मात्र त्यांनी सुनील नरायण आणि फिल सॉल्ट यांच्यावर सलामीची जबाबदारी सोपवली. नरायण हा कोलकाताचा जुना आणि भरवशाचा खेळाडू आहे. गौतम गंभीर कर्णधारपदी असताना नरायण नियमितपणे सलामीला येत असे. गंभीर मेन्टॉर झाल्यानंतर नरायणकडे पुन्हा सलामीवीराची भूमिका देण्यात आली. फिल सॉल्ट हा इंग्लंडचा युवा विकेटकीपर फलंदाज. सॉल्ट याआधी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता. सॉल्ट उत्तम फटकेबाजी करू शकतो आणि विकेटकीपिंगही करतो यामुळे त्याच्याकडे दुहेरी जबाबदारी सोपवण्यात आली. या जोडीने कोलकाताची निम्मी मोहीम फत्ते केली. नरायण अपारंपरिक पद्धतीने खेळतो. त्याला रोखायचं कसं याचे आडाखे प्रतिस्पर्धी संघ तयार करेपर्यंत तो अर्धशतकापर्यंत पोहोचलेला असतो. विशेष म्हणजे स्पर्धेत कोलकातातर्फे सर्वाधिक धावा (४८८) नरायणच्या नावावर आहेत. यातच नरायणचा तडाखा दिसून येतो.दिल्लीला सॉल्टच्या गुणवत्तेचा उपयोग करुन घेता आला नाही, कोलकाताने मात्र त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवला. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी रवाना होण्यापूर्वी सॉल्टने संघाने दिलेल्या जबाबदारी पुरेपूर न्याय दिला.

अनुभवाला युवा ऊर्जेची साथ
कोलकाताने तब्बल २४.५ कोटी रुपये खर्चून ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला ताफ्यात समाविष्ट केलं. स्टार्कच्या अनुभवाला साजेसा गोलंदाज कोलकाताकडे नव्हता. कोलकाताचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित डोमेस्टिक क्रिकेटमधले भीष्माचार्य समजले जातात. त्यांनी हर्षित राणा आणि वैभव अरोरा या युवा भारतीय गोलंदाजांवर विश्वास ठेवला. मिचेल स्टार्क हा जगातल्या भेदक गोलंदाजांपैकी एक समजला जातो. त्याच्या बरोबरीने अतिशय अनुनभवी युवा खेळाडूंना उतरवणं धोक्याचं होतं. पण हर्षित-वैभव यांनी संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला. विकेट्स पटकावणं आणि धावांचा रतीब रोखणं अशा दोन्ही आघाड्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. मिचेल स्टार्कला सूर गवसेपर्यंत हर्षित-वैभव यांनी कोलकाताची गोलंदाजी समर्थपणे सांभाळली. स्टार्कच्या अनुभवाचा फायदा या दोघांना झाला. हर्षित राणाने १९ विकेट्स पटकावत कोलकाताच्या जेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली. यॉर्कर, उसळता चेंडू, इनस्विंग, आऊटस्विंग, कटर, स्लोअरवन अशी सगळं अस्त्रं परजत या जोडीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना अडचणीत टाकलं. मध्यंतरानंतर स्टार्कला लय सापडली आणि तो कोलकाताचं मुख्य अस्त्र झाला. वैभव अरोराने स्टार्कला तोलामोलाची साथ दिली.

ड्रे रस रुपी बॉलर
आंद्रे रसेल (ड्रे रुस) हा जगातल्या धोकादायक हिटर्सपैकी एक मानला जातो. पण यंदाच्या हंगामात कोलकाताने रसेलमधला गोलंदाज हेरला. फलंदाजीपेक्षाही रसेलने गोलंदाज म्हणून कोलकाताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याआधीच्या हंगामांमध्ये रसेलचा फिटनेस हा कोलकातासाठी काळजीचं कारण ठरला होता. हाफ फिट असतानाही रसेल खेळलेला चाहत्यांनी पाहिलं आहे. सामन्यादरम्यान दुखापत बळावल्याने ड्रेसिंगरुममध्ये परतताना रसेलला चाहत्यांनी पाहिलं आहे. यंदाच्या हंगामात रसेलचा फिटनेस ही कोलकाताची जमेची बाजू ठरली. रसेलने १५ सामन्यात १९ विकेट्स पटकावत प्रतिस्पर्धी फलंदाजांना नामोहरम केलं. उसळता चेंडू परिणामकारकरीत्या वापरणं ही रसेलची हातोटी. भागीदारी फोडण्यात वाकबगार असल्याचं रसेलने वारंवार सिद्ध केलं.

अय्यर द्वयी
श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर यांनी कोलकाताची मधली फळी तोलून धरली. सुनील नरायण-फिल सॉल्ट यांनी रचलेल्या पायावर कळस चढवण्याचं काम अय्यर द्वयीने केलं. या दोघांनी परिस्थितीनुरुप फलंदाजी केली हे यंदाच्या हंगामाचं वैशिष्ट्य ठरलं. श्रेयस आणि वेंकटेश दोघांनीही तीनशेहून अधिक धावा करत मधली फळी समर्थपणे सांभाळली. कठीण खेळपट्टीवर तंत्रशुद्धतेचा वस्तुपाठ सादर करत या दोघांनी संघाला अडचणीतून बाहेर काढलं. मोठी धावसंख्या रचण्यात किंवा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यात या दोघांची भूमिका अतिशय मोलाची ठरली.

श्रेयसचं नेतृत्व
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या वनडे वर्ल्डकपनंतरचा काळ श्रेयस अय्यरसाठी कठीण होता. पाठीच्या दुखण्याने त्याला सतावलं. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो खेळू शकला नाही. रणजी करंडक स्पर्धेत मुंबईसाठीही तो नियमित खेळू शकला नाही. बंगळुरूस्थित एनसीएने श्रेयस फिट असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं मात्र त्याचवेळी त्याला ही दुखापत सतावत होती. या सगळ्याची परिणती बीसीसीआयने वार्षिक करारातून श्रेयसला वगळण्यात आलं. क्रिकेट वर्तुळात यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचा मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज करार यादीच्या बाहेर गेल्याने अनेकांना धक्का बसला. दुखापतीमुळे श्रेयस गेल्या वर्षी आयपीएल स्पर्धेत खेळू शकला नव्हता. यंदाही दुखापतीमुळे तो नक्की खेळणार का याविषयी उलटसुलट चर्चा होत्या. मात्र श्रेयसने संघाची यशस्वी मोट बांधत जेतेपद मिळवून दिलं. क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीतील बदल यामध्ये श्रेयसचं कौशल्य दिसून आलं. वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू यांना खुबीने हाताळलं. यंदाच्या हंगामात संघ सातत्याने दोनशे, अडीचशेचा टप्पा ओलांडत आहेत. गोलंदाजांना प्रोत्साहित करण्यात श्रेयसचा वाटा सिंहाचा होता. कर्णधार म्हणून जबाबदारी घेत अनेक सामन्यात फिनिशरची भूमिका बजावली.