Mayank reveals Ishant and Navdeep advised : आयपीएल २०२४ मध्ये, लखनऊ सुपर जायंट्सचा युवा वेगवान गोलंदाज मयंक यादवने त्याच्या वेगवान चेंडूंनी धुमाकूळ घातला आहे. मयंक यादवने पंजाब किंग्जविरुद्ध पदार्पण केले असून आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांमध्ये त्याच्या वेगवान गोलंदाजीसमोर एकही फलंदाज टिकू शकलेला नाही. या कालावधीत, मयंक यादवने अनेक दिग्गज गोलंदाजांना आपल्या गतीने मागे टाकले आहे. आतापर्यंत ६ विकेट्ससह तो स्पर्धेतील पहिल्या ५ गोलंदाजांमध्ये आहे. मयंक यादवने आपल्या गोलंदाजीबाबत एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.

त्याला इशांत शर्मा आणि नवदीप सैनी यांच्याकडून महत्त्वाचा सल्ला मिळाला होता, ज्याचा खुलासा त्याने केला आहे. जिओ सिनेमाशी बोलताना मयंक यादवने सांगितले की, “दिल्लीमध्ये मी ज्या सर्व गोलंदाजांशी बोललो, त्यापैकी इशांत भाई आणि सैनी भाई यांनी मला सांगितले की, मला काही नवीन करायचे असले तरी, मी त्याच वेगाने गोलंदाजी केली पाहिजे. माझ्या गोलंदाजीत नवीन कौशल्यांची भर घालायची असेल, तर मग ते माझा वेग कायम ठेवून केले पाहिजे. मला असे कोणतेही कौशल्य नको आहे, ज्यात मला माझ्या वेगाशी तडजोड करावी लागेल.”

‘वेगापेक्षा विकेट्स घेण्यावर माझे लक्ष’-

आरसीबीविरुद्ध चार षटकांत १४ धावांत तीन विकेट्ल घेणाऱ्या मयंकने सांगितले की, त्याचे लक्ष नेहमीच विकेट घेण्यावर असते. मयंक यादव म्हणाला, “विकेट्स घेण्यावर आणि संघासाठी योगदान देण्यावर मी जितके लक्ष केंद्रित करतो तितके वेगावर करत नाही. मात्र, गोलंदाजी करताना मी ही गोष्ट लक्षात ठेवतो की, मी जेव्हाही गोलंदाजी करतो तेव्हा माझा वेग चांगला असायला हवा. सामन्यानंतर, मी नेहमी लोकांना विचारतो की सामन्यातील सर्वात वेगवान चेंडूचा वेग किती होता, परंतु सामन्यादरम्यान मी फक्त माझ्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करतो.” मयंक यादवला सलग दुसऱ्या सामन्यात सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. तो प्रथमच आयपीएलमध्ये खेळत आहे.

हेही वाचा – IPL 2024 : मयंक यादवचा झंझावात कसा रोखायचा? मॅथ्यू हेडनने फलंदाजांना दिला गुरुमंत्र

भारतासाठी जास्तीत जास्त खेळण्याचे ध्येय –

ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन आणि रजत पाटीदार यांना बाद करणाऱ्या या गोलंदाजाने सांगितले की, भारतासाठी जास्तीत जास्त सामने खेळण्याचे आपले ध्येय आहे. २१ वर्षीय गोलंदाज म्हणाला, ‘भारतासाठी जास्तीत जास्त खेळण्याचे माझे ध्येय आहे. मला वाटते की ही माझ्यासाठी फक्त सुरुवात आहे आणि माझे संपूर्ण लक्ष ध्येय साध्य करण्यावर आहे.’ त्याला सामन्यातील त्याच्या आवडत्या विकेटबद्दल विचारले असता तो म्हणाला, ‘कॅमरून ग्रीनची विकेट.’