आयपीएल २०२५च्या प्लेऑफमधील पहिल्या क्वालिफायर सामन्यात आरसीबीने आपला दबदबा कायम ठेवला आहे. आरसीबीने पॉवरप्लेमध्येच ४ विकेट चटकावत पंजाब किंग्सना बॅकफूटवर टाकलं आहे. आरसीबीच्या वेगवान गोलंदाजांनी वादळी कामगिरी करत पंजाबच्या एकाही गोलंदाजाला फार वेळ मैदानावर टिकू दिलं नाही. यादरम्यान विराट कोहलीच्या मैदानावरील एनर्जीने आणि विकेटनंतरच्या सेलिब्रेशनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
आरसीबीने या सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर पंजाब किंग्सला फलंदाजीसाठी पाचारण केलं. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंगने पहिल्या षटकात ९ धावा करत सुरूवात केली. यानंतर दुसऱ्या षटकापासून विकेट पडायला सुरूवात झाली आणि पंजाबचा संघ डाव सावरू शकला नाही.
सामन्यातील दुसऱ्या षटकात यश दयालने पहिली विकेट घेतली. त्याने प्रियांश आर्यला कृणाल पंड्याकरवी झेलबाद केलं आणि संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. यानंतर विराट कोहलीने कमालीचं सेलिब्रेशन करत विकेटचा आनंद साजरा केला. यानंतर तिसऱ्या षटकात भुवनेश्वर कुमारने चांगले फटके खेळणाऱ्या प्रभसिमरनला माघारी धाडलं. जितेश शर्माच्या विकेटच्या मागे एक सोपा झेल टिपला. प्रभसिमरन १८ धावा करत बाद झाला.
चौथ्या षटकात जोश हेझलवूड गोलंदाजीला आला. त्याने दुखापतीनंतर पुनरागमन करत चौथ्या चेंडूवर श्रेयस अय्यरला झेलबाद केलं. श्रेयसच्या बॅटची कड घेत चेंडू जितेश शर्माने चेंडू टिपला. कर्णधार अय्यर २ धावा करत पहिल्या क्वालिफायरमध्ये झेलबाद झाला. यानंतर सहाव्या षटकात हेझलवूडने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. हेझलवूडने जोश इंग्लिसला ४ धावांवर झेलबाद करवत चौथी विकेट मिळवून दिली.