शारजाच्या मैदानावर काल चौकार, षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. किंग्ज इलेव्हन पंजाबने दिलेले २२४ धावांचे अशक्यप्राय वाटणारे लक्ष्य राजस्थानने तीन चेंडू राखून पार केले. संजू सॅमसन, स्टीव्ह स्मिथ आणि राहुल तेवतिया या तिघांच्या ‘रॉयल’ खेळीमुळे राजस्थानला हा विजय साकारता आला. या तिघांमध्ये उजवा ठरला तो, अष्टपैलू राहुल तेवतिया.
अखेरच्या षटकांमध्ये राहुल तेवतिया या उदयोन्मुख फलंदाजाने केलेल्या फटकेबाजीने संपूर्ण सामन्याचा नूरच पालटून टाकला आणि राजस्थानने चमत्कार वाटेल अशा विजयाची नोंद केली. पंजाबच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत तेवतियाने ३१ चेंडूत ७ षटकारांनिशी ५३ धावा केल्या. तेवतियाने मैदानावर षटकारांचा पाऊस पाडला असला तरी, त्याची सुरुवात अडखळतच झाली होती.
संजू सॅमसनची एकाबाजूला दमदार फलंदाजी सुरु असताना तेवतियाने पहिल्या १९ चेंडूत फक्त आठ धावा केल्या होत्या. सॅमसन बाद झाला तेव्हा, प्रतिषटक रनरेट १४ पर्यंत पोहोचला होता. सामना जिंकण्यासाठी राजस्थानला धमाकेदार खेळीची आवश्यकता होती. त्याचवेळी तेवतियाला सूर गवसला व त्याने नंतरच्या ४५ धावा अवघ्या १२ चेंडूत केल्या.
शेल्डन कोट्रेलने टाकलेल्या १८ व्या षटकात तेवतियाने ५ षटकार खेचत सामन्याचं चित्र पूर्णपणे पालटलं. मोहम्मद शामीच्या १९ व्या षटकात राहुल तेवतिया ५३ धावांवर बाद झाला, पण तो पर्यंत त्याने संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवले होते.
सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना राहुल तेवतिया म्हणाला की, “पहिले २० चेंडू माझ्यासाठी खूपच खराब होते. नेटमध्ये मी चेंडू चांगला फटकावायचो. त्यामुळे माझा स्वत:वर पूर्ण विश्वास होता. मी खेळ सुरु ठेवला. सुरुवातीला मला चांगले फटके खेळता आले नाहीत. मी डग-आऊटकडे पाहिले, तिथे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुक्ता होती. त्यांना माहित होते की, मी चेंडू लांबपर्यंत पोहोचवू शकतो, मोठे फटके खेळू शकतो.”
“मी विचार केला, मला स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे. फक्त एका षटकाराचा प्रश्न होता, त्यानंतर मला सूर गवसला” असे राहुल तेवतियाने सांगितले.
“प्रशिक्षकांनी मला लेग स्पिनरच्या गोलंदाजीवर षटकार खेचण्यासाठी पाठवलं होतं. पण दुर्देवाने त्या षटकात मला मोठे फटके खेळता आले नाहीत. त्याऐवजी मी दुसऱ्याची गोलंदाजी फोडून काढली” असे राहुल तेवतियाने सामना संपल्यानंतर सांगितले.