आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स यांच्यात एलिमिनेटर सामना खेळवला जात आहे. या सामन्यात मुंबईचा राजा रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याने प्लेऑफ सामन्यात अर्धशतकी खेळी करत मुंबईला चांगल्या धावसंख्येपर्यंत आणलं आहे. यादरम्यान रोहित शर्माने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे.

रोहित शर्माने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे, जो आजपर्यंत कोणताही भारतीय फलंदाज करू शकला नाही, तो रोहित शर्माने करून दाखवला आहे. एलिमिनेटरमध्ये रोहित शर्माला दोन जीवदान मिळाले असले तरी, त्यानंतरही रोहित शर्माने त्याच्या आक्रमक शैलीत थोडाही वेग कमी केला नाही.

आयपीएल एलिमिनेटरमध्ये रोहित शर्माला सुरुवातीलाच दोन षटकांमध्ये जीवदान मिळाले. प्रथम तीन धावांवर आणि नंतर १२ धावांवर त्याचा झेल सुटला. यानंतर, रोहित शर्माने कोणतीही संधी दिली नाही आणि सातत्याने धावा करताना दिसला. रोहित शर्माने यासह २७ चेंडूत अर्धशतकी खेळी पूर्ण केली.

रोहित शर्माने या सामन्यात दोन षटकार मारताच, तो आयपीएलमध्ये ३०० षटकार मारणारा भारताचा पहिला आणि आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा फलंदाज बनला. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत ख्रिस गेल अव्वल स्थानावर आहे. त्याने फक्त १४२ आयपीएल सामन्यांमध्ये ३५७ षटकार मारले आहेत. तो इतका पुढे आहे की इतर कोणत्याही फलंदाजाला त्याची बरोबरी करण्यासाठी बराच काळ लागेल.

दरम्यान, आता रोहित शर्माने ३०० षटकारांचा टप्पाही गाठला आहे. रोहित शर्माचा आयपीएलमधील हा २७२ वा सामना आहे. तर विराट कोहली लवकरच ३०० षटकार पूर्ण करू शकतो. कोहलीने आतापर्यंत २६६ आयपीएल सामन्यांमध्ये २९१ षटकार मारले आहेत, म्हणजेच त्याला फक्त ९ षटकारांची आवश्यकता आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज

३५७ – ख्रिस गेल (१४१ डाव)

३००* – रोहित शर्मा (२६६ डाव)

२९१ – विराट कोहली (२५८ डाव)

२६४ – एम.एस. धोनी (२४२ डाव)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२५१ – एबी डिव्हिलियर्स (१७० डाव)