IPL 2020 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा सहावा सामना मंगळवारी राजस्थानच्या संघाशी होणार आहे. आतापर्यंत मुंबईच्या संघाने पाचपैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानचा संघ चारपैकी दोन सामने जिंकला आहे. राजस्थान रॉयल्सची IPLमधील मोहीम पुन्हा विजयपथावर आणण्यासाठी त्यांच्या संघातील भारतीय खेळाडूंना खेळ उंचावण्याची नितांत आवश्यकता आहे. समतोल आणि बलाढ्य अशा मुंबई इंडियन्सशी मंगळवारी होणाऱ्या लढतीत जयदेव उनाडकट आणि रियान परागला डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे. याचदरम्यान, राजस्थान संघाने एक फोटो पोस्ट करून रोहित शर्माला प्रश्न विचारला आहे.

राजस्थान रॉयल्सच्या संघाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. परंतु कामगिरीत सातत्य राखण्यात त्यांचे खेळाडू अपयशी ठरत आहेत. त्यामुळे राजस्थानचे खेळाडू कसून सराव करत आहेत. पण याचदरम्यान राजस्थानने रोहित शर्मालाही एक प्रश्न विचारला आहे. राजस्थानच्या संघाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मरीन ड्राईव्हचा तो फोटो आहे. “रोहित, हा बघ मरिन ड्राईव्हचा फोटो. किती सुंदर निसर्ग आहे. तुला आजच्या दिवशी (सामन्यात न खेळता) इथे जावंसं वाटत नाहीये का?”, असा मिश्कील प्रश्न राजस्थान रॉयल्सच्या ट्विटर अकाऊंटवरून विचारण्यात आला आहे.

फलंदाजीचे नंदनवन मानल्या जाणाऱ्या शारजात राजस्थानने यंदाच्या हंगामात झोकात प्रारंभ केला होता. परंतु दुबई आणि अबू धाबीच्या आकाराने मोठ्या मैदानांवर त्यांची कामगिरी ढासळली. चार सामने खेळणाऱ्या राजस्थानच्या खात्यावर दोन विजयांसह चार गुण जमा आहेत. राजस्थानला आता प्रतीक्षा ११ ऑक्टोबरपर्यंत विलगीकरणात असणाऱ्या बेन स्टोक्सची आहे. जोस बटलरची (३ सामन्यांत ४७ धावा) फलंदाजी, उनाडकटची (४ सामन्यांत १ बळी) गोलंदाजी ही राजस्थानच्या अपयशाची प्रमुख कारणे आहे. याशिवाय, युवा परागसुद्धा प्रभाव दाखवू शकलेला नाही. कर्णधार स्टीव्ह स्मिथ परागच्या जागी युवा यशस्वी जैस्वालला संधी देण्याची दाट शक्यता आहे. शिवाय मुंबईविरुद्ध उनाडकटऐवजी अनुभवी वरुण आरोन किंवा युवा कार्तिक त्यागीला संधी मिळू शकेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.