आयपीएलच्या तेराव्या हंगामात रविवारचा दिवस महत्वपूर्ण ठरला. शारजाच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सने जिगरबाज खेळ करत पंजाबने विजयासाठी दिलेलं २२४ धावांचं आव्हान ४ गडी राखून पूर्ण केलं. स्टिव्ह स्मिथ, संजू सॅमसन आणि राहुल तेवतियाने केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थानने पंजाबच्या हातून विजयाचा घास खेचून आणला. पंजाबवर मात करुन राजस्थानने तब्बल १२ वर्षांनी आपल्याच नावावर असलेला विक्रम मोडीत काढला आहे.

आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्सने सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे २००८ साली आयपीएलच्या पहिल्याच हंगामात राजस्थानने डेक्कन चार्जर्सविरोधात २१५ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. यानंतर १२ वर्ष हा विक्रम राजस्थानच्या नावावर अबाधित होता. यानंतर राजस्थाननेच रविवारी हा विक्रम मोडत नवीन इतिहास नोंदवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अष्टपैलू राहुल तेवतिया राजस्थानच्या विजयाचा खऱ्या अर्थाने हिरो ठरला. २२४ धावसंख्येचा पाठलाग करताना संजू सॅमसन, स्टिव्ह स्मिथ मोक्याच्या क्षणी माघारी परतले. भरवशाचा रॉबीन उथप्पाही फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात बाद झाला. परंतू तेवतियाने संयम राखत कोट्रेलच्या गोलंदाजीवर ५ षटकार खेचत सामना राजस्थानच्या दिशेने झुकवला. अखेरच्या षटकांत शमीने तेवतियाला तर मुरगन आश्विनने रियान परागला माघारी धाडत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. परंतू टॉम करनने चौकार खेचत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.