श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर यंदाच्या आयपीएलसाठी दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी भारताचा डावखुरा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली आहे. दिल्लीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत घोषणा केली. पंतची कर्णधारपदी निवड झाल्यानंतर दिल्लीचा मागील हंगामातील कर्णधार श्रेयस अय्यरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला श्रेयस?

श्रेयस अय्यरने ऋषभ पंतला आयपीएलमध्ये चांगल्या कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात तो म्हणाला, “जेव्हा मला दुखापत झाली आणि दिल्ली कॅपिटल्सला कर्णधार हवा होता, तेव्हा ऋषभ पंत एक उत्तम पर्याय असेल, यात मला शंका नव्हती. त्याला शुभेच्छा देतो की तो संघासोबत उत्कृष्ट कामगिरी करेल. मला या संघाची आठवण येईल, पण मी संघाचा उत्साह वाढवत राहीन.”

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अय्यर जायबंदी

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यर जायबंदी झाला. इंग्लंडच्या संघाची फलंदाजी सुरू असताना 8व्या षटकात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोने मारलेला फटका अडवताना श्रेयसच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. खांद्यांच्या हाडाला झालेली दुखापत ठीक होण्यास जवळपास सहा आठवड्यांचा वेळ लागतो. शिवाय सर्जरी झाली तर काही महिन्यांचा कालावधी लागतो.

कर्णधार म्हणून पंतची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दिल्लीतच मी वाढलो आणि मोठा झालो. सहा वर्षांपूर्वी दिल्लीतूनच माझ्या आयपीएल करिअरला सुरुवात झाली. एक दिवस दिल्लीचे नेतृत्व करावे, हे स्वप्न मी आजपर्यंत पाहात आलो आहे. आणि आज ते स्वप्न सत्यात उतरले आहे. मी त्यासाठी खूप आनंदी आहे”, अशी प्रतिक्रिया ऋषभ पंतने दिली आहे.

आयपीएलमध्ये पंतने आत्तापर्यंत 68 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने तब्बल 2 हजार 79 धावा फटकावल्या आहेत. त्यात तब्बल 183 चौकार आणि 103 षटकारांचा समावेश आहे. शिवाय 12 अर्धशतके आणि एका तडाखेबाज शतकाचा देखील त्यात समावेश आहे.