हैदराबाद सनरायजर्सची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी लक्षवेधी ठरली असून गुणतालिकेत हा संघ अव्वल स्थानी आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात हैदराबादला विजय मिळाला. पण या विजयानंतर संघव्यवस्थापनाला मोठा दिलासा मिळाला असेल आणि यासाठी कारणीभूत आहे सूर गवसलेला शिखर धवन. यंदाच्या आयपीएलमध्ये छाप पाडण्यात अपयशी ठरलेल्या शिखर धवनने दिल्लीविरुद्ध ५० चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ९२ धावा केल्या.

हैदराबादकडून खेळणाऱ्या शिखर धवनने आयपीएलच्या सुरुवातीला राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना नाबाद ७८ धावांची खेळी. १२ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ४५ धावांची खेळी केली. मात्र, यानंतर तो अपयशी ठरत होता. यानंतरच्या सात सामन्यांमध्ये धवनला फक्त ७५ धावाच करता आल्या. यामुळे हैदराबादच्या गोटात चिंतेचे वातावरण होते. कर्णधार केन विल्यमसनचा अपवाद वगळता बाकीच्या फलंदाजांच्या कामगिरीत सातत्य नव्हते. त्यामुळे आता महत्त्वाच्या टप्प्यात धवनला सूर गवसणे संघासाठी आवश्यक होते.
गुरुवारी धवनला अखेर सूर गवसला. सलामीची जोडी अवघ्या १५ धावांवर फोडण्यात दिल्लीच्या गोलंदाजांना यश आले. यानंतर धवनने कर्णधार विल्यमसनच्या साथीने संघाला विजयापर्यंत नेले. या अनुभवी खेळाडूंनी धावफलक हलता ठेवला. खराब चेंडूवर चौकार, षटकार मारुन आवश्यक रन रेट कायम ठेवला. धवनने ३० चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले. यात ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. यानंतर धवननेने विल्यमसनच्या साथीने फटकेबाजी सुरु केली आणि संघाला विजयापर्यंत नेले.

धवनने ५० चेंडूत नाबाद ९२ धावांची खेळी केली. यात एकूण ९ चौकार आणि चार षटकांराचा समावेश होता. धवनचे शतक आठ धावांनी हुकले. पण त्यापेक्षा संघाला मिळालेला विजय हा महत्त्वाचा ठरला. या खेळीसाठी धवनला सामनवीराचा पुरस्कार देण्यात आला.
यानंतर मुरली कार्तिकशी बोलताना धवन स्वतःच म्हणाला, गब्बर इज बॅक. यातून धवनचा आत्मविश्वास दिसून येतो. तो पुढे म्हणतो, ऋषभ पंतने चांगली खेळी केली. त्याने शतक ठोकून आमच्याकडून सामना हिरावलाच होता. पण फलंदाजीला मैदानात उतरताना सकारात्मक मानसिकतेने उतरायचे, असे आम्ही ठरवले. मैदानात केन आणि माझ्यात फारसं बोलणंही झाले नाही. आम्ही आमच्या खेळावर लक्ष केंद्रीत ठेवले, असेही त्याने सांगितले. तुम्ही सहजपणे हा सामना जिंकला, यावर तू काय म्हणशील, असा प्रश्न कार्तिकने त्याला विचारला. यावर धवन म्हणाला, धिस इस माय क्लास. धवनच्या या वाक्यातून त्याच्यातला दिल्लीकर दिसून येतो.