राजस्थान रॉयल्सवर मात करुन स्पर्धेत दिमाखदार पुनरागमन करणाऱ्या RCB संघाची अवस्था पुन्हा एकदा बिकट झाली. दुबईच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने RCBवर ५९ धावांनी सहज मात केली. दिल्लीने विजयासाठी दिलेल्या १९७ धावांचं आव्हान बंगळुरुला पेलवलं नाही. कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता RCBच्या इतर सर्व फलंदाजांनी दिल्लीच्या माऱ्यासमोर शरणागती पत्करली. त्यामुळे बंगळुरुचा डाव १३७ धावांवरच आटोपला. या सामन्यात ऋषभ पंतने लगावलेला एक षटकार खूपच चर्चेत राहिला.

दिल्लीच्या डावात १९वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज आला. शेवटची षटके असल्याने फलंदाज प्रत्येक चेंडू चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न करणार हे सिराजला ठाऊक होतं. त्यामुळे पंतला वेगवान गोलंदाजी करायची या आवेशाने त्याने पहिला चेंडू टाकला पण चेंडू त्याला हातून सुटल्यावर थेट पंतच्या हेल्मेटच्या उंचीने गेला. चेंडू ऋषभला लागतो की काय असं वाटत असतानाच त्याने बेसबॉल खेळाडू ज्याप्रकारे बॅट फिरवतात त्याप्रमाणे अचानक बॅट फिरवली आणि षटकार मिळवला.

क्रिकेट की बेसबॉल… तुम्हीच ठरवा

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील त्या शॉटनंतर ट्विटकरत पंतचं कौतुक केलं. त्याने लगावलेला षटकार हा खरंच अविश्वसनीय होता, असं ट्विट सचिनने केलं.

असा रंगला सामना

दिल्लीचे सलामीवर पृथ्वी शॉ आणि शिखर धवनची यांनी सुरूवातीपासूनच फटकेबाजी केली. पृथ्वी शॉने बंगळुरुच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये बंगळुरुकडून वॉशिंग्टन सुंदरचा अपवाद वगळता सर्व गोलंदाज अपयशी ठरले. धवन आणि शॉ जोडीने दमदार कामगिरी केली. पृथ्वीने ४२ धावा केल्या तर धवन ३२ धावांवर बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यर माघारी परतल्यावर स्टॉयनिस आणि पंत जोडीने भागीदारी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्येकडे नेलं. अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसने नाबाद ५३ धावा करत संघाला १९६ धावांपर्यंत मजल मारून दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बंगळुरूच्या संघाची सुरुवात खराब झाली. देवदत पडीकल, फिंच आणि डिव्हीलियर्स हे तीन महत्त्वाचे खेळाडू झटपट माघारी परतले. यानंतर कर्णधार विराट कोहलीने मोईन अलीच्या साथीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही फलंदाजांमध्ये एक महत्वाची भागीदारी झाली. पण अक्षर पटेलने मोईन अलीला बाद करत जोडी फोडली. एकीकडे इतर सर्व फलंदाज बाद होत असताना विराट कोहलीने एक बाजू लावून धरत झुंज सुरु ठेवली होती, योग्य वेळी कॅगिसो रबाडाला गोलंदाजी देत दिल्लीने विराटचा काटा काढला. विराट ४३ धावा करून माघारी परतल्यावर इतर फलंदाजही हजेरी लावून तंबूत परतले आणि RCBचा ५९ धावांनी पराभव झाला.