बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल याने तुफानी शतक झळकावले. नाणेफेकीच्या वेळी नशिबाने राहुलची साथ दिली नाही. पण फलंदाजीत मात्र राहुलला नशिबाने पुरेपूर साथ दिली. बंगळुरूच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई करत त्याने नाबाद १३२ धावांची खेळी केली आणि विराट कोहलीच्या बंगळुरू संघाला २०७ धावांचे तगडे आव्हान दिले. विराट कोहलीने लोकेश राहुलला दोन वेळा झेल सोडला आणि ते दोन झेल विराटच्या चांगलेच महागात पडले.

विराट कोहलीने राहुलचा दोन वेळा सीमारेषेजवळ झेल सोडला. ५५ चेंडूत ८३ धावांवर राहुल खेळत असताना राहुलने उंच चेंडू उडवला. विराटला तो चेंडू झेलणं शक्य होतं पण घाईगडबडीत त्याच्या हातून झेल सुटला. त्यानंतर लगेचच सहा धावांनंतर लोकेश राहुल ५९ चेंडूत ८९ धावांवर खेळत होता. त्यावेळीदेखील राहुलने हवेत उंच चेंडू मारला. हा झेल आधीच्या झेल पेक्षा खूपच सोपा होता पण विराट तो झेलदेखील पकडता आला नाही त्यामुळे राहुलला दोन वेळा जीवनदाना मिळालं. आणि महत्त्वाची बाब म्हणजे भारताच्या सर्वोत्तम खेळाडूकडून दोन वेळा झेल सुटल्याचे चाहत्यांना पहावे लागले. त्यामुळे सोशल मीडियावर विराट तुफान ट्रोल झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नाणेफेक जिंकून विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला पण पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल याने तो निर्णय़ चुकीचा ठरवून दाखवला. मयंक अग्रवाल आणि राहुलने संघाला चांगली सुरुवात करून दिली. मयंक अग्रवाल २० चेंडूत २६ धावा काढून बाद झाला. निकोलस पूरनदेखील मोठा फटका खेळताना १७ धावा करून माघारी परतला. तर ग्लेन मॅक्सवेलने ५ धावा केल्या आणि तो बाद झाला. पण कर्णधार राहुल मात्र एका बाजूने खेळत राहिला. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला अस्मान दाखवण्याचा विडा उचलल्याप्रमाणे त्याने फलंदाजी केली. विराट कोहलीने तब्बल दोनदा त्याचा झेल सोडला. त्याचा फायदा घेत राहुलने तुफानी शतक ठोकलं. त्याने ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा केल्या. त्यात १४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता.