Yuzvendra Chahal close to 200 wickets in IPL : आयपीएलच्या १७ व्या हंगामातील २७ वा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा राजस्थान संघाचा स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहलच्या कामगिरीवर खिळल्या आहेत, ज्याला आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी करण्याची सुवर्ण संधी आहे. राजस्थान रॉयल्स संघासाठी आतापर्यंतचा हा मोसम खूप चांगला राहिला आहे, ज्यामध्ये त्यांनी ५ पैकी ४ सामने जिंकले आहेत. त्यामुळे या सामन्यातही विजय मिळवण्याकडे त्यांचे लक्ष असेल, जेणेकरुन ते प्लेऑफमध्ये आपले स्थान सहज निश्चित करु शकतील. या हंगामात युजवेंद्र चहलची गोलंदाजीतील कामगिरीही आतापर्यंत दमदार राहिली असून तो पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी आहे.

२०० विकेट्ल घेणारा पहिला गोलंदाज ठरु शकतो –

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम युजवेंद्र चहलच्या नावावर आहे, ज्याने १५० सामने खेळताना २१.२६ च्या सरासरीने १९७ विकेट्स घेतल्या आहेत. चहलने पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात आणखी ३ विकेट्स घेतल्यास, २०० विकेट्सचा टप्पा गाठणारा तो आयपीएल इतिहासातील पहिला गोलंदाज ठरेल. चहलने आपल्या टी-२० कारकिर्दीत आतापर्यंत एकूण २९५ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर २३.१० च्या सरासरीने ३४६ विकेट्स आहेत. त्याला ३५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी आणखी ४ विकेट्सची गरज आहे. भारताकडून या फॉरमॅटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही युजवेंद्र चहलच्या नावावर आहे.

यशस्वी जैस्वालला ५० षटकार पूर्ण करण्याची संधी –

राजस्थान रॉयल्स संघाचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वालला ५० षटकार पूर्ण करण्याची संधी आहे. ज्याने या आयपीएल हंगामात आतापर्यंत एकही मोठी खेळी खेळली नाही, जर त्याने पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात एक षटकार मारला, तर तो आयपीएलमधील कारकीर्द ५० षटकारांचा आकडा गाठेल. राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनने या आयपीएल हंगामात आतापर्यंत बॅटने उत्कृष्ट कामगिरी केली आहे, जर तो या सामन्यात ४३ धावांची इनिंग खेळण्यात यशस्वी झाला, तर तो त्याच्या आयपीएल कारकिर्दीत ३५०० धावा पूर्ण करेल.

हेही वाचा – LSG vs DC IPL 2024 : आयुष बडोनीने एमएस धोनीच्या खास विक्रमाशी साधली बरोबरी, ‘या’ विशेष यादीत झाला सामील

मोहालीचे खेळपट्टी हाय स्कोअरिंगसाठी खास –

मोहालीत पहिला सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना ९ गड्यांच्या मोबदल्यात १७४ धावा केल्या, तर पंजाबने १९.२ षटकात ६ गडी गमावून १७७ धावा करत सामना जिंकला. दुसऱ्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना ९ गडी गमावून १८२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल पंजाब किंग्ज संघाने १८० धावा केल्या होत्या, मात्र अखेर त्यांना २ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

हेही वाचा – पंड्या बंधूंना बदनामीची धमकी

मोहालीची खेळपट्टीवर तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज –

मोहालीचे महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आता तिसरा सामना खेळवण्यासाठी सज्ज आहे. येथे हाय स्कोअरिंग सामने होत असल्याचे तुम्ही पाहिले आहे. सध्या स्टेडियम नवीन आहे आणि खेळपट्टीही तशीच आहे, त्यामुळे चेंडू फलंदाजांच्या बॅटवर योग्य उसळी घेऊन येत आहे. यासोबतच वेगवान गोलंदाजांनाही थोडी मदत होत आहे. म्हणजेच सामना सुरू झाला की पहिल्या काही षटकांमध्ये वेगवान गोलंदाज प्रभाव पाडू शकतात, परंतु त्या वेळेची काळजी घेतली तर त्यांना धावा करण्यापासून रोखणे फार कठीण जाईल.