करोना विषाणूचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशभरात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. गेल्या काही दिवसांमध्ये केंद्र सरकारने काही गोष्टी सुरु करण्याची परवानगी दिली असली, परिस्थितीचा अंदाज घेऊन काही राज्यांनी लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला. हातावर पोट असणाऱ्या व रोजगारासाठी दररोज मेहनत करणाऱ्या कामगार व मजुरांना या लॉकडाउनचा फटका बसला. बीसीसीआयनेही आयपीएलचा तेरावा हंगाम या काळात स्थगित केल्यामुळे, चेन्नई सुपरकिंग्ज संघातील खेळाडूंचे शूज, पॅड, ग्लोव्ह्ज व इतर गोष्टींची काळजी घेणारे आर. भास्करन यांच्यावर खडतर वेळ आली होती. दोन महिन्यांपासून भास्करन यांचा रोजगार तुटल्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना अडचण येत होती. माजी क्रिकेटपटू इरफान पठाणला भास्करन यांच्याबद्दल समजल्यानंतर त्याने आपल्या मित्रांकरवी भास्करन यांच्याशी संपर्क साधत त्यांना २५ हजारांची आर्थिक मदत केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चेन्नईतील Wallajah रोडवर भास्करन १९९३ पासून चपला दुरुस्त करण्याचं छोटंस दुकान चालवतात. गेल्या १२ वर्षांपासून भास्करन आयपीएलच्या दरम्यान चेन्नई संघातील खेळाडूंचे शूज, ग्लोव्ह्ज, पॅड इ. गोष्टींची देखभाल आणि दुरुस्ती करत असतात. मात्र यंदाच्या वर्षी करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम अनिश्चीत काळासाठी पुढे ढकलला आणि भास्करन यांचा हक्काचा रोजगार तुटला. “आयपीएलदरम्यान प्रत्येक सामन्यादरम्यान मी १ हजार रुपये कमवायचो. याव्यतिरीक्त चेन्नईतील काही खेळाडूही माझी काळजी घ्यायचे आणि मला वेळोवेळी मदत करायचे. हंगाम संपला की खेळाडू आणि प्रशिक्षक सर्व एकत्र येऊन मला मदत करायचे. गेल्या वर्षी मी जवळपास २५ हजाराची कमाई केली, याव्यतिरीक्त धोनीनेही मला वेगळी मदत केली.” भास्करन प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यंदा लॉकडाउनमुळे माझं कमाईचं साधन बंद झाल्यामुळे, इतरांकडून पैसे उधारीवर मागायची वेळ माझ्यावर आली. किराणा सामनासाठी मला उधार पैसे मागावे लागले. काही दिवसांपूर्वी इरफान पठाणने मला २५ हजारांची मदत केली. यापुढे माझं कसं होईल सांगता येत नाही. क्रिकेट लवकर सुरु झालं नाही, तर मी संपलो, अशी हताश प्रतिक्रीया भास्करन यांनी व्यक्त केली. दरम्यान, इरफान पठाणने भास्कर यांना केलेल्या मदतीसाठी त्याचं कौतुक होताना दिसत आहे.

दोन महिन्यांपूर्वी देशभरात करोनाचा प्रादूर्भाव वाढत असतानाही इरफान आणि युसूफ पठाण बंधूंनी वेळोवेळी गरजू व्यक्तींना मास्क, सॅनिटायजर, अन्नधान्य इ. वस्तू पुरवल्या होत्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irfan pathan comes to the rescue of csk cobbler depending on ipl for sustenance psd
First published on: 16-06-2020 at 20:10 IST