Irfan Pathan Reveals Verbal Spat with Shahid Afridi Video: भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणने पाकिस्तानचा खेळाडू शाहीद आफ्रिदीबरोबर प्रवासादरम्यान झालेल्या वादाचा खुलासा केला आहे. क्रिकेट मैदानावर इरफान आणि आफ्रिदीचे काही वाद आपण पाहिले आहेत. इरफानने २००७च्या विश्वचषक अंतिम फेरीत आफ्रिदीला गोल्डन डकवर बाद केलं होतं. दरम्यान इरफान पठाण आणि आफ्रिदीमध्ये प्रवासादरम्यान कोणत्या मुद्द्यावरून वाद झाला होता, जाणून घेऊया.
गेल्या काही वर्षांत, आपण पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीला भारतीय खेळाडूंविरुद्ध, विशेषतः गौतम गंभीरविरुद्ध विचित्र वक्तव्य करताना पाहिलंय. पण फक्त गंभीरच नव्हे तर इरफान पठाणबाबतही त्याने विचित्र वक्तव्य केली आहेत. यादरम्यान लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत इरफान पठाणने त्यांच्यातील वादाला कशी सुरूवात झाली हे सांगितलं.
इरफान पठाण म्हणाला, २००६ च्या पाकिस्तान दौऱ्यादरम्यान, “आम्ही कराचीहून लाहोरला विमानाने प्रवास करत होतो. दोन्ही संघ एकत्र प्रवास करत होते. आफ्रिदी आला आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माझे केस विस्कटले. त्याने मला विचारलं, ‘बेटा, कसा आहेस?’ माझ्या मनात आलं, असं लहान मुलांसारखं कोण वागतं.” हे ऐकून इरफान थोडा वैतागला.
इरफान पठाणने काढली शाहीद आफ्रिदीची लाज, विमान प्रवासात काय घडलं?
“मी म्हणालो, ‘तू कधीपासून माझा बाप झालास?’ तो माझा मित्रही नव्हता. त्यानंतर आफ्रिदीने मला काही अपशब्द बोलला. त्याची सीट माझ्या जवळच होती. माझ्या बाजूला अब्दुल रज्जाक बसले होते. मी त्यांना विचारलं कोणकोणत्या प्रकारचं मांस इथे मिळतं. त्यांनी मला वेगवेगळे प्रकार सांगितले, मग मी त्यांना विचारलं की कुत्र्याचं मांस मिळतं का? अफरीदी तिथेच बसला होता,” पुढे इरफानने सांगितलं.
“माझा प्रश्न ऐकताच त्यांनी मला विचारलं, अरे इरफान असं का विचारतोय तू? मी म्हणालो, आफ्रिदी कुत्र्याचं मटण खाऊन आलाय वाटतं… कधीपासून भुंकतोय. यानंतर अफरीदी काहीच बोलला नाही. पुन्हा त्याने काही बोलायला सुरूवात केली की तेच वाक्य म्हणायचो. त्यानंतर संपूर्ण प्रवासात शांत होता.”, असा संपूर्ण प्रसंग इरफान पठाणने सांगितला.