इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धा प्रथमच आयोजित केली जात असली तरी बायच्युंग भुतिया, सुनील छेत्री, रॉबिन सिंग यांच्यासह दिग्गज फुटबॉलपटू त्यामध्ये सहभागी होण्याची शक्यता कमी आहे, असे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) सचिव कुशल दास यांनीच कबूल केले.
आयएसएलकरिता अनेक व्यावसायिक क्लबच्या व्यवस्थापनांनी अनुभवी खेळाडूंना यंदा मुक्त करण्यास सपशेल नकार दिला आहे. पुढच्या आयएसएलकरिता आम्ही या खेळाडूंना सोडण्याबाबत विचार करू, असे क्लबच्या मालकांनी एआयएफएफला कळविले आहे. त्या संदर्भात नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात दास म्हणाले, ‘‘अनेक क्लबच्या मालकांनी नामांकित खेळाडूंना दोन-तीन वर्षांकरिता करारबद्ध केले आहे. त्यामुळे यंदाच्या आयएसएलमध्ये नामांकित खेळाडूंचा सहभाग अनिश्चितच आहे. मात्र स्थानिक खेळाडूंना संधी देण्याबाबत प्राधान्य दिले जाईल.’’
‘‘१७-वर्षांखालील गटाची विश्वचषक स्पर्धा २०१७ मध्ये भारतात होणार आहे. त्याकरिता संघ उभारण्याच्या प्रक्रियेस लवकरच प्रारंभ होईल. आम्ही ३० खेळाडूंचे दोन संघ तयार करून त्यांना रीतसर अकादमीत प्रशिक्षण देणार आहोत. या दोन संघांकरिता दोन स्वतंत्र अकादमी गोव्यात सुरू केल्या जाणार आहेत. या अकादमीकरिता दोन-तीन परदेशी प्रशिक्षकांचीही नियुक्ती केली जाणार आहे. तसेच या खेळाडूंना परदेशातील विविध स्पर्धामध्ये भाग घेण्याचीही संधी दिली जाणार आहे,’’ असेही दास यांनी सांगितले.
विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून २०१६मध्ये १६-वर्षांखालील गटाची आशियाई अजिंक्यपद स्पर्धाही भारतात होणार आहे याबाबत दास म्हणाले, ‘‘विश्वचषक स्पर्धेची ठिकाणे निश्चित करण्यासाठी डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे शिष्टमंडळ भारतात येणार आहे व जानेवारीत ही ठिकाणे निश्चित केली जातील. जागतिक  दर्जाची निवासव्यवस्था, सुरक्षाव्यवस्था, अव्वल दर्जाचा प्रसार माध्यम कक्ष, आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान व विद्युतव्यवस्था या निकषांच्या आधारे ही ठिकाणे निश्चित केली जाणार आहेत.’’
‘‘फुटबॉलच्या विकासाकरिता ग्रामीण भागातील नैपुण्यशोधावर भर दिला जाणार आहे. आयएसएलमधील सर्व फ्रँचायजींना प्रशिक्षण अकादमी स्थापन करण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे आठ अकादमींची लवकरच स्थापना होईल. त्याखेरीज आणखीही तीन-चार अकादमी सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे,’’ असेही दास यांनी सांगितले.
फुटबॉलचा तळागाळात प्रसार होण्याची गरज -व्हादेर
फुटबॉलमध्ये जागतिक स्तरावर अव्वल दर्जाचे यश मिळवायचे असेल तर भारतात तळागाळात या खेळाचा प्रसार होण्याची आवश्यकता आहे, असे नेदरलँड्सचे ज्येष्ठ खेळाडू गिडो व्हादेर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘भारतात या खेळाची लोकप्रियता अफाट आहे. भारतातील अनेक स्पर्धामध्ये परदेशी खेळाडू भाग घेत आहेत. या स्पर्धाना प्रेक्षकांचाही भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मात्र अपेक्षेइतका दर्जा भारताचे खेळाडू गाठू शकले नाहीत. त्याकरिता नैपुण्यशोध व विकास कार्यक्रम सर्वदूर राबविण्याची आवश्यकता आहे. तसेच देशातील प्रमुख ठिकाणी कृत्रिम मैदानांची उभारणी करण्याचीही आवश्यकता आहे.’’