भारतीय फुटबॉलला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारी स्पर्धा म्हणून इंडियन सुपर लीग (आयएसएल)कडे पाहिले जात आहे. फुटबॉलची समृद्ध परंपरा असलेला गोवा एफसी संघ दोन खेळाडूंमुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. फ्रान्सला १९९८मध्ये फिफा विश्वचषक आणि २००मध्ये युरो चषक जिंकून देणारा रॉबर्ट इमान्युएल पिरेस तसेच पेले यांच्यानंतरचे ब्राझीलचे महान फुटबॉलपटू आणि ‘व्हाइट पेले’ म्हणून ओळखले जाणारे आर्थर अँटय़ुनेस कोइम्ब्रा अर्थात झिको यांच्या समावेशामुळे आयएसएलकडे मोठय़ा अपेक्षेने पाहिले जात आहे.
१९९६ ते २००४ या कालावधीत फ्रान्स संघाचे प्रतिनिधित्व करताना अनेक वेळा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही पटकावला आहे. पेले यांच्या सर्वोत्तम १०० खेळाडूंच्या यादीत रॉबर्ट पिरेसला स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर अर्सेनल, व्हिलारिअल अ‍ॅस्टन व्हिलासारख्या अव्वल संघाकडून खेळताना यशस्वी कामगिरी केली आहे. पिरेस सध्या गोवा एफसी संघाकडून खेळत असून भारतीय खेळाडूंना आधुनिक फुटबॉलचे तंत्र शिकवण्याची जबाबदारी पिरेसवर सोपवण्यात आली आहे. आयएसएलचा भारताला कितपत फायदा होईल, भारतीय खेळाडूंची गुणवत्ता याविषयी रॉबर्ट पिरेसशी केलेली ही बातचीत-
*अर्सेनल, व्हिलारिअलसारख्या बलाढय़ क्लबचे प्रतिनिधित्व केले आहेस. मग आयएसएलची निवड का केलीस?
फुटबॉल या खेळावर माझे जीवापाड प्रेम आहे. कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात मी पोहोचलो असलो तरी मी अद्यापही खेळू शकतो, याची खात्री होती. म्हणूनच मी आयएसएलमध्ये खेळण्याचे ठरवले. आव्हाने स्वीकारायला मला नेहमीच आवडते. आता भारताला फुटबॉलवेडा देश बनवण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. आयएसएलच्या निमित्ताने ते शिखर सर करता येईल, अशी आशा आहे.
*भारतीय खेळाडूंच्या गुणवत्तेबाबत काय सांगशील?
काही दिवसांपूर्वीच मी भारतात फुटबॉल खेळायला सुरुवात असली तरी भारतात अफाट गुणवत्ता आहे. भारतातील गुणवान खेळाडूंसोबत खेळताना फारच मजा येते. कर्तृत्ववान खेळाडूंसाठी आयपीएल हे योग्य व्यासपीठ आहे, असे मला वाटते. भारतीय खेळाडूंच्या तंदुरुस्तीचे कौतुक करावे तितके कमी आहे.
*आयएसएलमुळे भारतीय फुटबॉलला झळाळी मिळेल का?
भारतातील फुटबॉलला नवसंजीवनी देण्यासाठी आयएसएल ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आधुनिक फुटबॉलचे तंत्र आत्मसात केल्यास, भारतीय फुटबॉलचे भवितव्यही उज्ज्वल आहे. निकोलस अनेल्का, डेव्हिड ट्रेझेग्युएट, मार्को माटेराझी, अलेसांड्रो डेल पिएरो यांच्याकडून भारतीय खेळाडूंना भरपूर काही शिकता येण्यासारखे आहे. या दिग्गज खेळाडूंमुळे आयएसएलकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आयएसएलचा भारतीय फुटबॉलवर सकारात्मक प्रभाव पडेल, असे मला वाटते.
*गोवा संघातील तुझ्याकडून असलेल्या अपेक्षांविषयी काय सांगशील?
गोवा संघाच्या माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. पण सध्या मी शिक्षकाच्या भूमिकेत आहे. युवा खेळाडूंना शिकवण्यासाठी मला पाचारण केले आहे. भारतातील फुटबॉलमध्ये गुणवत्ता असून उत्तम फुटबॉल शिकण्याची संधी भारतीय खेळाडूंना मिळणार आहे. माझ्यावर सर्वात मोठी जबाबदारी असून युवा खेळाडूंना शिकवणे हे माझ्यासाठी सर्वात महत्ताचे आहे. मैदानापेक्षा मैदानाबाहेरील घडामोडींसाठी माझ्याकडून फार मोठय़ा अपेक्षा आहेत.
*झिकोसारखे महान खेळाडू हे गोवा संघाला प्रशिक्षक म्हणून लाभले आहेत. त्यांच्याकडून काय शिकायला मिळाले?
झिकोसारखे प्रशिक्षक लाभणे, हे माझ्यासारख्या खेळाडूचे भाग्यच समजतो. झिको यांच्याकडून मला भरपूर काही शिकता आले. विश्वचषक विजेते खेळाडू असलेले झिको यांच्याबद्दल सर्वच खेळाडूंच्या मनात आदर आहे. सराव करताना झिको यांच्याकडे सर्वाचे लक्ष लागलेले असते.
*भारतात खेळण्याचा तुझा अनुभव कसा आहे?
भारतातील उष्ण वातावरणाशी कसे जुळवून घेता येईल, याची चिंता सुरुवातीला वाटत होती. पण आता मी येथील वातावरणाशी जुळवून घेतले आहे. आमची तयारी चांगली झाली असून आमची कामगिरीही उत्तम होत आहे. त्यामुळे जेतेपद पटकावण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isl will change the face of indian football robert pires
First published on: 17-11-2014 at 12:49 IST