बिजींग शहरात सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या आणखी एक नेमबाजपटूने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. १० मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या अभिषेक वर्माने सुवर्णपदक मिळवलं आहे. या कामगिरीसोबत अभिषेक वर्माने २०२० ऑलिम्पिकमध्ये आपलं स्थान निश्चीत केलं आहे. २०२० ऑलिम्पिकला पात्र ठरणारा अभिषेक भारताचा पाचवा नेमबाजपटू ठरला आहे.

पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत अभिषेकने आपली आघाडी कायम ठेवली होती. २४२.७ गुणांची कमाई करत अभिषेकने पहिलं स्थान मिळवलं. २९ वर्षीय अभिषेकचं नेमबाजी विश्वचषकातलं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. रशियाच्या आर्तेम चेर्नोसॉव्हला रौप्य तर कोरियाच्या सेयुंग्वो हानला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.

या कामगिरीसह १० मी. एअर पिस्तुल प्रकारात २०२० ऑलिम्पिकसाठी भारताने आपल्या दोन जागा नक्की केल्या आहेत. दिल्लीत झालेल्या स्पर्धेत सौरभ चौधरीने ऑलिम्पिक कोटा नक्की केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.