Saim Ayub On India vs Pakistan Match: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सर्वात महत्वाचा सामना रंगणार आहे. याआधी हा सामना होणार की नाही?असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण भारत सरकारने या सामन्यासाठी मंजुरी दिल्याने हा सामना होणार हे निश्चित झालं आहे. रविवारी होणाऱ्या या सामन्याच्या पुर्वसंध्येला पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेसाठी पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने स्वत: येण्याऐवजी सलमीवीर फलंदाज सईम अयुबला पाठवलं. दरम्यान पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर देताना सईम अयुबने या सामन्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

भारत- पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, तेव्हा हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळत असतो. पण आम्ही कुठलाही दबाव घेणार नसल्याचं पाकिस्तानचा सलामीवीर सईम अयुबने म्हटलं आहे. लोकांसाठी हा मोठा सामना असेल, पण आम्ही केवळ एक संघ म्हणून या सामन्याकडे पाहत आहोत.

पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देताना सईम अयुबने म्हटले की, “लोकांसाठी हा मोठा सामना असेल, पण आम्ही तेच करणार आहोत जे आम्ही प्रत्येक सामन्यात करतो.” अयुबच्या मते, हा सामना त्यांच्यासाठी फार महत्वाचा सामना नाही. या सामन्यातही ते त्याच रणनीतीसह मैदानात उतरणार आहेत, ज्या रणनीतीचा वापर ते इतर संघांविरूद्ध करतात. भारतीय संघाबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना तो टाळाटाळ करताना दिसला. यावरून हे स्पष्ट आहे की, भारतीय संघाची दमदार कामगिरी पाहून पाकिस्तानचा संघ घाबरला आहे. याआधी त्यांनी अनेकदा भारतीय संघाला पराभूत करून असं चॅलेंज दिलं आहे. पण यावेळी आला पाकिस्तानचा खेळाडू असं काहीच म्हणाला नाही.

तसेच तो पुढे म्हणाला की, “ही स्पर्धा आमच्यासाठी महत्वाची आहे. आम्ही केवळ भारत- पाकिस्तान सामन्याची वाट पाहत नाही आहोत. आम्हाला ही स्पर्धा जिंकायची आहे.” भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ या स्पर्धेत ३ वेळेस आमनेसामने येऊ शकतात. साखळी फेरीतील सामने झाल्यानंतर दोन्ही संघ सुपर ४ मध्ये भिडणार आहेत. जर पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहोचला, तर अंतिम फेरीतही भारत- पाकिस्तान सामना होऊ शकतो. याआधी दोन्ही संघ २०२४ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत न्यूयॉर्कमध्ये झालेल्या सामन्यात आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर दमदार विजयाची नोंद केली होती.