अंतिम सामन्यात रोनाल्डोच्या युव्हेंटस संघावर ३-१ अशी मात
ख्रिस्तियानो रोनाल्डोसारख्या नामांकित खेळाडूंभोवती बचावपटूंचा सापळा रचल्यावर आक्रमणपटूंनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या बळावर लॅझिओने सोमवारी इटालियन सुपर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात युव्हेंटसला ३-१ अशी धूळ चारून पाचव्यांदा विजेतेपदावर नाव कोरले.
कोपा इटालिया आणि सेरी ए फुटबॉल स्पर्धेतील विजेत्यांमध्ये इटालियन चषक खेळवण्यात येतो. सौदी अरेबिया येथील किंग सौद युनिव्हर्सिटी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात १६व्या मिनिटाला लुईस अल्बटरेने लॅझिओसाठी पहिला गोल केला. मात्र मध्यंतरापूर्वीच्या अखेरच्या मिनिटाला पावलो डिबेलाने (४५) गोल नोंदवून युव्हेंटसला १-१ अशी बरोबरी साधून दिली.
दुसऱ्या सत्रातही लॅझिओच्याच खेळाडूंचे वर्चस्व दिसून आले. ७३व्या मिनिटाला सीनॅड लुसिचने लॅझिओसाठी दुसरा गोल केला. भरपाई वेळेतील अखेरच्या मिनिटात (९०+४) डॅनिलो कॅटाल्डीने तिसरा गोल साकारून लॅझिओच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
रेयाल माद्रिदने संधी गमावली
सँटिगो बर्नाब्यू : अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या रेयाल माद्रिद संघाने ला लिगा फुटबॉलच्या गुणतालिकेत वर्षांखेरीस अग्रस्थान मिळवण्याची संधी गमावली. रविवारी रात्री झालेल्या सामन्यात अॅटलेटिक बिलबाओ संघाने रेयालला ०-० असे बरोबरीत रोखले. त्यामुळे रेयालच्या खात्यात १० सामन्यांतून ३७ गुण जमा असून बार्सिलोनाने ३९ गुणांसह अग्रस्थान टिकवले आहे.
२ युव्हेंटसला यंदाच्या वर्षांत दुसऱ्यांदा पराभूत करणारा लॅझिओ हा एकमेव संघ आहे. त्यांनी दोन आठवडय़ांपूर्वीच सेरी ए स्पर्धेत युव्हेंटसला ३-१ असे नमवले होते.