बेल्जियमवर २-१ अशी मात करून उपांत्य फेरीत प्रवेश

एपी, म्युनिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या सत्रात निकोलो बरेला आणि लॉरेंझो इन्सिनिया यांनी केलेल्या गोलमुळे इटलीने युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या बेल्जियमचा २-१ असा पाडाव केला. यासह इटलीने लागोपाठ १५ सामने जिंकण्याच्या (पात्रता फेरीसह) नव्या विक्रमासह उपांत्य फेरीत धडक मारली.

बरेलाने ३१व्या मिनिटाला शानदार गोल करत इटलीला आघाडीवर आणले. यान वेटरेनघेन याला चेंडूवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्यानंतर मार्को वेराट्टीने चेंडू बरेलाकडे पास केला. बरेलाने कोणतीही चूक न करता इटलीसाठी पहिला गोल केला. त्यानंतर इन्सिनिया याने लांबूनच मारलेला फटका बचावपटूंच्या डोक्यावरून थेट गोलजाळ्यात गेला. ४४व्या मिनिटालाच २-० अशी आघाडी घेतल्यानंतर बेल्जियमला पहिल्या सत्राच्या अखेरीस पेनल्टी मिळाली. त्यावर रोमेलू लुकाकूने गोल लगावला. त्याचा हा युरो चषकातील सहावा गोल ठरला. इटलीने यंदाच्या स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाकडून दुसरा गोल स्वीकारला.

इटलीने यंदाच्या युरो चषकात तब्बल ११ गोल लगावले. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या, पण एकालाही चेंडूला गोलजाळ्यात धाडता आले नाही. आता उपांत्य फेरीत इटलीची गाठ मंगळवारी मध्यरात्री स्पेनशी पडणार आहे. ६ निकोला बरेलाने आपला सहावा आंतरराष्ट्रीय गोल झळकावला. त्याने लगावलेल्या गोलमुळे इटलीने सर्व सामने जिंकले ३बेल्जियमला युरो चषकाच्या गेल्या पाच पराभवांपैकी तीन सामने इटलीविरुद्धच गमवावे लागले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Italy dominance unaffected belgium euro 2020 ssh
First published on: 04-07-2021 at 00:50 IST