टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्रता सामने खेळवले जात आहेत. इटलीच्या संघाने इतिहास घडवत प्रथमच टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. इटलीचा पात्रता फेरीतील अखेरचा सामना नेदरलँड्स संघाशी होता. या सामन्यात पराभूत झाल्यानंतरही इटलीचा संघ वर्ल्डकपसाठी पात्र ठरला.
शुक्रवारी हेगमधील स्पोर्टपार्क वेस्टव्हलिट येथे झालेल्या युरोपियन पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात इटलीला नेदरलँड्सकडून नऊ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. इटली संघाला पराभव पत्करावा लागला असला तरी पुढील वर्षी टी-२० विश्वचषकासाठी संघ पात्र ठरला आहे. गुरुवारी स्कॉटलंडलापराभूत केल्यानंतर, इटलीने वर्ल्डकपसाठी पात्र ठरण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं होतं.
इटलीला अखेरच्या पात्रता फेरीतील सामन्यात पराभूत करत नेदरलँड्सचा संघही टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरला आहे. इटली आणि नेदरलँड्स दोन्ही संघ आगामी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यासारख्या बलाढ्य संघांविरूद्ध खेळताना दिसतील.
इटलीचा संघ कमालीच्या नेत रन रेटमुळे वर्ल्डकपसाठी पात्र ठरला आहे. दुसऱ्या सामन्यात जर्सी संघाने स्कॉटलंडवर मोठा विजय मिळवला, पण इटलीचा नेट रन रेट संघासाठी पात्र ठरण्यात महत्त्वाचा ठरला. क्रिकेट जागतिक क्रमवारीत ३२ व्या क्रमांकावर असलेल्या इटलीने जर्सीच्या बरोबरीने पाच गुणांसह अंतिम फेरी गाठली, परंतु नेट-रन रेटमुळे संघाला मदत झाली. इटलीविरूद्ध विजयासह नेदरलँड्सचा संघ गुणतालिकेत ६ गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला.
इटलीने या स्पर्धेत ४ पैकी २ सामने जिंकले आणि ०.६१२ च्या नेट रन रेटसह जर्सी (०.३०६) ला मागे टाकून हे यश मिळवले. इटलीने या स्पर्धेत स्कॉटलंडविरुद्ध सर्वात मोठा विजय नोंदवला, जो त्यांच्यापेक्षा अधिक अनुभवी संघ आहे आणि अनेक विश्वचषक खेळला आहे. इटलीप्रमाणेच, जर्सीनेही त्यांच्या शेवटच्या सामन्यात स्कॉटलंडला १ विकेटने हरवून सर्वांना आश्चर्यचकित केले आणि वर्ल्डकपसाठी पात्र ठरण्याच्या आशा जिवंत ठेवल्या.
शेवटच्या सामन्यात इटलीने नेदरलँड्सला १५ षटकांत विजय मिळवण्यापासून रोखले, ज्यामुळे जर्सी संघाच्या वर्ल्डकप खेळण्याच्या आशा तिथेच संपल्या. दरम्यान, इटली आणि नेदरलँड्स संघ विश्वचषकासाठी पात्र ठरले. या पात्रता स्पर्धेत नेदरलँड्सने पहिले स्थान मिळवले. त्यामुले प्रथम इटली आणि नंतर जर्सीकडून पराभव पत्करावा लागलेल्या स्कॉटलंडला पात्रता फेरीतून बाहेर पडावे लागले.