शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेनंतर श्रीलंकेचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा महेला जयवर्धने याने केली. आता अँजेलो मॅथ्यूसकडे नेतृत्व सोपविले जाण्याची शक्यता आहे.
जयवर्धने म्हणाला की, युवा नेतृत्व योग्य वेळी पुढे येण्याची आवश्यकता आहे. उपकर्णधार मॅथ्यूसकडे चांगली नेतृत्वक्षमता आहे. तो त्या पदाला योग्य न्याय देऊ शकेल. या वर्षी जानेवारी महिन्यात तिलकरत्ने दिलशानकडून जयवर्धनेकडे १२ महिन्यांसाठी कर्णधारपद देण्यात आले होते. जयर्वधनेने दुसऱ्यांदा हे पद सांभाळले. होबार्टमध्ये शुक्रवारपासून सुरू होणारी पहिली कसोटी ही जयवर्धनेच्या कारकिर्दीमधील १३६वी कसोटी आहे. श्रीलंकेचा कर्णधार म्हणून ही माझ्यासाठी अखेरची मालिका असेल. यानंतर पुन्हा माझ्या वाटय़ाला नेतृत्वाची संधी येणार नाही, असे जयवर्धने यावेळी म्हणाला.