नेयमार, लिओनेल मेस्सी, आर्येन रॉबेन, रॉबिन व्हॅन पर्सी या स्टार खेळाडूंचा फिफा विश्वचषकावर सध्या बोलबाला दिसत आहे. फुटबॉल चाहत्यांमध्येही याच तगडय़ा खेळाडूंची चर्चा आहे. भलेही मेस्सी आणि नेयमार यांनी प्रत्येकी चार गोल करून फुटबॉल विश्वचषकामध्ये दमदार कामगिरी केली असली तरी कोलंबियाच्या जेम्स रॉड्रिगेझ या युवा खेळाडूनेही ब्राझीलमध्ये कर्तृत्वाचा ठसा उमटवत आपल्या संघाला तब्बल २४ वर्षांनंतर दुसऱ्या फेरीत मजल मारून दिली आहे.
तीन गोल, तीन वेळा गोलसाहाय्य आणि तीनदा सामनावीर पुरस्कार ही जेम्सची २०१४च्या फिफा विश्वचषकातील आतापर्यंतची कमाई. त्यामुळे या उगवत्या स्टारची फुटबॉलपंडितांमध्ये चर्चा होणे स्वाभाविकच आहे. २०१३मध्ये जेम्सला पोटरेकडून मोनॅको संघाने ४५ दशलक्ष युरोला करारबद्ध केले. ब्राझीलच्या हल्कपाठोपाठ पोर्तुगीज फुटबॉलमधील ती सर्वोत्तम बोली ठरली होती. लीग-१च्या पहिल्याच मोसमात जेम्सने ३० सामन्यांत ९ गोल आणि १२ गोलसाहाय्य अशी दमदार कामगिरी केली. आता मोनॅको संघाचा तो प्रमुख आधारस्तंभ बनला आहे.
१६ वर्षांनंतर फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या कोलंबियाची मदार रादामेल फलकाव या त्यांच्या स्टार खेळाडूवर होती. पण दुखापतीमुळे फलकावने या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे कोलंबियाच्या अभियानाची जबाबदारी कोण उचलणार, हा प्रश्न त्यांना सतावत होता. कोलंबियासमोर पहिलीच परीक्षा होती ग्रीसची. भक्कम बचाव, प्रतिहल्ले चढवण्यासाठी प्रतीक्षा करणारा ग्रीसचा संघ. पण कोलंबियाने वेग, ऊर्जा आणि पदलालित्याचे सुरेख प्रदर्शन घडवत ग्रीसला नामोहरम केले. पाचव्या मिनिटाला कोलंबियाच्या पहिल्याच यशात गोलसाहाय्य केल्यामुळे जेम्सचा आत्मविश्वास उंचावला होता. २-०ने आघाडी घेतल्यामुळे कोलंबियाचा पहिला विजय निश्चित झाला होता. सामना संपायला काही मिनिटे शिल्लक होती. पाबलो अर्मेरोच्या पासवर जेम्सने विश्वचषकातील पहिला गोल लगावला. तीन गोल कोलंबियाच्या खात्यात पडले पण त्यांच्यासमोर दुसरे आव्हान होते ते दिदियर द्रोग्बाच्या आयव्हरी कोस्टचे. पहिल्या सत्रात कोलंबियाने आयव्हरी कोस्टला गोल करण्याची कोणतीही संधी दिली नाही. त्यानंतर कोलंबियासाठी धाऊन आला तो जेम्स रॉड्रिगेझ. कॉर्नरवरून मिळालेल्या क्रॉसवर हेडरद्वारे जेम्सने गोल नोंदवला होता. सामन्याला कलाटणी देणारा तो गोल ठरला. पण इतकेच करून तो थांबला नाही. जुआन क्विंटेरोने केलेल्या दुसऱ्या गोलात जेम्सने गोलसाहाय्यकाची भूमिका बजावली होती.
सलग तिसऱ्या विजयासह ‘क’ गटात अव्वल स्थान पटकावण्याचे उद्दिष्ट कोलंबियाने ठेवले होते. जुआन कुआड्राडोने कोलंबियासाठी पहिला गोल केल्यानंतर पहिल्या सत्राच्या अखेरीस शिंजी ओकाझाकीने जपानला बरोबरी साधून दिली. मध्यंतरानंतर जेम्स नावाचे वादळ मैदानावर अवतरले आणि जपानच्या बाद फेरीच्या स्वप्नांचा चुराडा झाला. जेम्सने दिलेल्या पासवरच जॅक्सन मार्टिनेझने दोन गोल झळकावले होते. पण विश्वचषकातील सर्वोत्तम गोलमध्ये नोंद होईल, असा चौथा गोल जेम्सने लगावला होता. जेम्सच्या प्रत्येक गोलाने कोलंबियाला तीन विजय मिळवून दिले होते.
कोलंबियाची आता बाद फेरीतील लढत असेल ती ‘चावऱ्या’ लुइस सुआरेझच्या उरुग्वे संघाशी. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचे उद्दिष्ट कोलंबियासमोर आहे. दक्षिण अमेरिकन संघांमध्ये १० क्रमांकाच्या जर्सीला मोठा इतिहास आहे. दक्षिण अमेरिकन खेळाडूंमधून सर्वोत्तम १० क्रमांकाचा खेळाडू या पुरस्कारासाठी सध्या नेयमार आणि जेम्स हेच आघाडीवर आहेत. आता कोलंबियाचा हा नवा तारा आपल्या देशाचे उपांत्यपूर्व फेरीचे स्वप्न साकार करतोय का आणि नेयमारला मागे टाकून हा मान पटकावतो का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.