Auqib Nabi Record: बंगळुरूत दुलीप ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत जम्मू – काश्मीरचा गोलंदाज औकिब नबीने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीचा सामना ईस्ट झोन आणि नॉर्थ झोन या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने दिग्गज कर्णधार कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडून काढला आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना नॉर्थ झोनने १७५ धावांची भक्कम आघाडी घेतली. दरम्यान गोलंदाजी करताना औकिब नबीने १०.१ षटक गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने २८ धावा खर्च केल्या आणि ५ फलंदाजांना माघारी धाडलं. ज्यात एका हॅट्ट्रिकचा समावेश आहे. शेवटचे ४ गडी हे त्याने सलग ४ चेंडूत बाद केले. यासह मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

औकिब नबी हा दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात सलग ४ चेंडूवर ४ गडी बाद करणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. तर या स्पर्धेत हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम करणारा तो तिसराच गोलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम दिग्गज कर्णधार कपिल देव आणि फिरकी गोलंदाज साईराज बहुतुले यांच्या नावावर होता. या दमदार गोलंदाजीसह त्याने दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

यासह त्याच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलग ४ चेंडूवर ४ गडी बाद करणारा चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी एस सेन यांनी १९८८-८९ मध्ये दिल्लीकडून खेळताना हा पराक्रम केला होता. त्यानंतर जम्मू – काश्मीरचा गोलंदाज एस मुधासीरने २०१८-१९ मध्ये खेळताना हा पराक्रम केला होता. त्यानंतर मध्य प्रदेशचा गोलंदाज कुलवंत खेजरोलिवाने २०२३-२४ हंगामात गोलंदाजी करताना सलग ४ चेंडूत ४ गडी बाद करण्याचा विक्रम केला होता. आता या खेळाडूंच्या विक्रमाच्या यादीत औकिब नबीच्या नावाचा देखील समावेश करण्यात आला आहे.