रॉजर फेडरर, राफेल नदाल, मारिया शारापोव्हा या दिग्गजांना अल्पावधीतच गाशा गुंडाळावा लागल्याने विम्बल्डननगरीत आश्चर्यकारक निकालांची मालिकाच सुरू झाली होती. मात्र जेतेपदासाठी दावेदार असणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिच आणि सेरेना विल्यम्स यांनी प्रतिस्पध्र्याना चमत्काराची कोणतीही संधी न देता विजयासह चौथ्या फेरीत आगेकूच केली.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जोकोव्हिचने फ्रान्सच्या २८व्या मानांकित जेरेमी चार्डीवर ६-३, ६-२, ६-२ असा सरळ सेट्समध्ये विजय मिळवला.
स्पर्धेत आतापर्यंत सव्‍‌र्हिस राखलेल्या जोकोव्हिचची पुढील फेरीत टॉमी हासशी लढत होणार आहे. नुकत्याच झालेल्या फ्रेंच खुल्या स्पर्धेत जोकोव्हिचने हासला नमवले होते. मात्र १३व्या मानांकित हासने मियामी स्पर्धेत जोकोव्हिचवर मात केली होती तसेच २००९मध्ये विम्बल्डन स्पर्धेतच उपांत्यपूर्व फेरीतही हासने जोकोव्हिचला पराभूत केले होते. त्यामुळे हासला कमी लेखण्याची चूक जोकोव्हिच करणार नाही.
‘‘कोर्टवर उतरताना मला आत्मविश्वास होता. योजनांनुसार माझा खेळ केला. सव्‍‌र्हिसचे गुण मी अद्याप गमावलेले नाहीत. अशा प्रकारे सामना जिंकणे सुखावणारे आहे,’’ असे जोकोव्हिचने सांगितले.
अन्य लढतींमध्ये स्पेनच्या डेव्हिड फेररने संघर्षपूर्ण लढतीत युक्रेनच्या अलेक्झेंडर डोलगोपोलोव्हवर ६-७ (६-८), ७-६ (७-२), २-६, ६-१, ६-२ असा विजय मिळवला. पुढच्या फेरीत फेररचा मुकाबला क्रोएशियाच्या इव्हान डोडिगशी होणार आहे.
इटलीच्या २३व्या मानांकित आंद्रेस सेपीने जपानच्या केई निशिकोरीला नमवत शानदार विजय मिळवला. सेपीने निशिकोरीला ३-६, ६-२, ६-७ (४-७), ६-१, ६-४ असे नमवले. अर्जेटिनाच्या ज्युआन मार्टिन डेल पोट्रोने स्लोव्हेनियाच्या ग्रेगा झेमलिजाचा ७-५, ७-६ (७-३), ६-० असा पराभव केला.
महिलांमध्ये सेरेना विल्यम्सनेही जेतेपदाच्या दिशेने दमदार आगेकूच केली. सेरेनाने जपानच्या ४२ वर्षीय किमिको डेट-क्रुमचा ६-२, ६-० असा धुव्वा उडवला. सेरेनाचा कारकीर्दीतला हा ६००वा विजय होता. पुढच्या फेरीत सेरेनाची लढत २३व्या मानांकित सबिन लिसिकीशी होणार आहे. लिसिकीविरुद्ध विजय मिळविल्यास सेरेनासाठी तो सलग ३५ विजय असणार आहे. बहीण व्हीनस विल्यमने २०००मध्ये रचलेल्या विक्रमाची बरोबरी करण्याची सेरेनाला संधी आहे.
‘‘सेंटर कोर्टवर विजय आणि तोही सहाशेवा. मला अजिबातच कल्पना नव्हती. अतिशय आनंद झाला आहे,’’ असे सेरेनाने सांगितले.
पोलंडच्या अ‍ॅग्निेझेस्का रडवानस्काने अमेरिकेच्या मॅडिसन केसवर ७-५, ४-६, ६-३ असा विजय मिळवला. सहाव्या मानांकित लि नाने संघर्षपूर्ण लढतीत चेक प्रजासत्ताकच्या क्लारा झाकोपालोव्हाला ४-६, ६-०, ८-६ असे नमवले. दरम्यान, पुरुष आणि महिलांमध्ये अव्वल १० पैकी ४ खेळाडूंनीच अंतिम १६ खेळाडूंत प्रवेश मिळवला.
सानिया-ह्य़ुबेर जोडीची आगेकूच
लंडन : सानिया मिर्झा आणि तिची अमेरिकन साथीदार लिझेल ह्य़ुबेर यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत तिसऱ्या फेरीत आगेकूच केली. सहाव्या मानांकित सानिया-ह्य़ुबेर जोडीने इटलीच्या फ्लाव्हिआ पेनेन्टा आणि आंद्रेआ पेटकोव्हिक जोडीवर ७-६, ३-६, ६-२ असा विजय मिळवला. ब्रेक पॉइंट्सचा प्रभावी उपयोग करत या जोडीने विजय मिळवला. पुढील फेरीत त्यांचा मुकाबला जपानच्या शुको ओयोमा आणि दक्षिण आफ्रिकेच्या चानेले शीपर्स जोडीशी होणार आहे. मिश्र दुहेरीत सायना रुमानियाच्या होरिआ टेकाऊच्या साथीने सहभागी होत आहे. सानिया-टेकाऊ जोडीला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे.