Wimbledon Jannik Sinner Carries Injured Grigor Dimitrov’s Bag: इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत काल जबरदस्त खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन पाहायला मिळाले. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या जॅनिक सिनर विरुद्धच्या सामन्यात ग्रिगोर दिमित्रोव्हला दुखापतीमुळे चौथ्या फेरीच्या लढतीतून माघार घ्यावी लागली.
१९ व्या मानांकित दिमित्रोव्हने, जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या सिनरवर ६-३, ७-५ अशी आघाडी घेत अलिकडच्या काळातील सर्वोत्तम कामगिरी केली होती. पण तिसऱ्या सेटच्या सुरुवातीला, ३४ वर्षीय ग्रिगोर दिमित्रोव्ह अचानक मैदानावर पडला. त्याच्या छातीत वेदना जाणवत होत्या. उजव्या बाजूच्या पेक्टोरल दुखापतीमुळे त्याला वैद्यकीय मदत घ्यावी लागली, परंतु त्यानंतर त्याला कोर्ट सोडावे लागले. यावेळी कोर्ट सोडताना त्याला अश्रू अनावर झाले होते.
दिमित्रोव्ह मैदानावर पडताच, २३ वर्षीय सिनर ताबडतोब त्याच्या प्रतिस्पर्ध्याजवळ गेला आणि दिमित्रोव्हची वैद्यकीय तपासणी होईपर्यंत तो त्याच्यापाशी थांबला. या दरम्यान सामना अधिकृतपणे थांबवण्यात आला. यानंतर सिनरने दिमित्रोव्हला त्याचे सामान गोळा करण्यास आणि त्याची किट बॅग कोर्टवरून बाहेर नेण्यास मदत केली. यानंतर सिनरच्या या कृतीचे चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत झाले. सिनरची ही कृती पाहून सेंटर कोर्टवरील प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे कौतुक केले.
“मला काय बोलावे ते कळत नाही, कारण दिमित्रोव्ह एक अप्रतिम खेळाडू आहे. मला वाटते की आपण सर्वांनी आज ते पाहिले असेल. गेल्या काही वर्षांत तो खूप दुर्दैवी ठरला आहे. तो माझा एक चांगला मित्र आहे आणि आम्ही एकमेकांना कोर्टवर खूप चांगले समजतो. जर त्याला पुढील फेरीत खेळण्याची संधी मिळाली असती, तर खूप छान झाले असते. तो त्यास पात्र आहे. मी या सामन्याकडे विजय म्हणून पाहत नाही,” असे सिनर दिमित्रोव्हबाबत बोलताना म्हणाला.