Jasprit Bumrah- Temba Bavuma: कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पहिल्या कसोटी सामन्याचा थरार रंगला. या सामन्यात भारतीय संघाला ३० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना झाल्यानंतर भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावूमाकडे गेला आणि त्याच्यासोबत चर्चा करताना दिसून आला. या दोघांचा चर्चा करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागला आहे.

बुमराह आपल्या गोलंदाजीमुळे आणि तेंबा बावूमा आपल्या फलंदाजीमुळे नेहमीच चर्चेत असतो. पण या सामन्यात दोघेही वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले. गोलंदाजी करत असताना, बुमराहचा चेंडू बावूमाच्या पॅडला जाऊन लागला. त्यावेळी भारतीय खेळाडू डीआरएस घ्यायचा की नाही, यावरून चर्चा करताना दिसून आले. नेमकं त्याचवेळी बुमराह बावूमाला बौना म्हणजेच बुटका म्हणाला. हा आवाज स्टंप माईकमध्ये कैद झाला. हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी बुमराहवर जोरदार टीका केली.

पण दक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर बुमराह स्वत: तेंबा बावूमाकडे गेला आणि त्याच्याशी चर्चा करताना दिसून आला. बुमराहने बावूमाच्या खांद्यावर हात ठेवला होता. दोघेही हसून काहीतरी चर्चा करत होते. दोघांमध्ये काय चर्चा झाली, हे कळू शकलेलं नाही. पण बुमराहने स्वत: हून तेंबा बावूमासोबत केलेल्या चर्चेचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.

भारताचा पराभव

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या १५९ धावांवर आटोपला होता. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने १८९ धावा करत पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेवर ३० धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या १५३ धावांवर आटोपला. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या १२४ धावा करायच्या होत्या. आव्हान फार मोठं नव्हतं, पण दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. त्यामुळे भारतीय संघाचा डाव ९३ धावांवर संपुष्टात आला. यासह दक्षिण आफ्रिकेने हा सामना ३० धावांनी आपल्या नावावर केला.