टोक्यो ऑलिंपिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा प्रदीर्घकाळाच्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरला आहे. त्यानंतर त्याने धडाकेबाज कामगिरी सुरू केली आहे. त्याने स्टॉकहोम येथील डायमंड लीग स्पर्धेमध्ये इतिहास रचला. नीरजने ८९.९४ मीटरच्या सुरुवातीच्या थ्रोसह आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला. २४ वर्षीय नीरजचा ९० मीटरचा टप्पा केवळ ६ सेमीने चुकला त्यामुळे तो रौप्य पदकाचा मानकरी ठरला. यापूर्वी नीरजने १४ जून २०२२ रोजी पावो नुर्मी गेम्समध्ये ८९.३० मीटर भाला फेकून विजेतेपद मिळवले होते.

नीरज चोप्राचा ९० मीटर थ्रो थोडक्याक चुकला. परंतु, राष्ट्रीय विक्रमासह त्याने या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वात चांगली कामगिरी केली आहे. प्रतिष्ठित डायमंड लीग स्पर्धेत त्याने प्रथमच पहिल्या तीनमध्ये स्थान पटकावले आहे. ऑलिंपिक चॅम्पियन नीरज चोप्राने जागतिक विजेता अँडरसन पीटर्सनंतर दुसरे स्थान पटकावले.

हेही वाचा – IND vs ENG 5th Test Match : हेल्मेटवर कॅमेरा लावून इंग्लंडचा खेळाडू करणार क्षेत्ररक्षण! जाणून घ्या कारण

निरजने केलेल्या कामगिरीमुळे केंद्रीय क्रीडा आणि माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. अनुराग ठाकूर यांनी लिहिले, “ऑलिंपिक चॅम्पियन नीरज चोप्राने एक नवीन राष्ट्रीय विक्रम केला. २०२२ स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने ८९.९४ मीटर भालाफेकून स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले.” ठाकूर यांनी त्याचा व्हिडीओही शेअर केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भालाफेकपटू नीरज चोप्रा १५ ते २४ जुलै दरम्यान अमेरिकेतील युजीन येथे होणार्‍या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये २२ सदस्यीय भारतीय तुकडीचे नेतृत्व करेल. भारतीय संघात १७ पुरुष आणि ५ महिला खेळाडू आहेत. भावना जाट आणि थाळीफेक पटू सीमा पुनिया यांनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. दोघींनाही राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करायचे आहे.