जोकिम लो.. वय वर्षे ५४. २०१४मध्ये जर्मनीच्या वरिष्ठ फुटबॉल विश्वचषक विजेत्या संघाच्या यशामागचे शिल्पकार. संघातील खेळाडूंची सरासरी वयोमर्यादा ३०-३१. पुन्हा जोकिम लो. वय वर्षे ५७. २०१७च्या कॉन्फेडरेशन चषक पटकावणाऱ्या जर्मन संघाच्या यशामागचे नायक. या वेळी संघातल्या खेळाडूंची सरासरी वयोमर्यादा २२ ते २५.

पुढील वर्षी रशियात होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पध्रेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेत अनुभवी खेळाडूंना डावलून २२-२३ वर्षांच्या युवकांना खेळवण्याचा निर्णय लो यांनी घेतला, तेव्हा सगळ्यांनी त्यांनी मूर्खात काढले. हा काय बावळटपणा आहे? एक वर्षांवर विश्वचषक स्पर्धा असताना अनुभवी खेळाडू संघाबाहेर का? लो यांचा विश्वविजेत्या खेळाडूंवरील विश्वास राहिलेला नाही का?.. ते जो यांना प्रशिक्षक पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची वेळ आली आहे, इथपर्यंत काही प्रश्न आणि सल्ले कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेसाठी जर्मनीचा संघ जाहीर करण्यात आला तेव्हा देण्यात आले. मात्र लो आपल्या मतावर ठाम राहिले. रशियात होणाऱ्या कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेत ते युवा सेना घेऊन दाखल झाले. येथेच २०१८मध्ये विश्वचषक स्पर्धा होणार आहे आणि जेतेपद कायम राखण्याचे दडपण जर्मनीच्या वरिष्ठ खेळाडूंवर असणार आहे. याची कल्पना असतानाही लो यांचा युवा खेळाडूंना खेळवण्याचा निर्णय थोडा गोंधळात टाकणारा होता. पण पुढील धोक्याचा इशारा ऐकून त्यांनी युवकांना संधी देण्याचा चतुर निर्णय घेतला. २०१४मध्ये जर्मनीने विश्वचषक जिंकला, त्या वेळी बहुतेक खेळाडू तिशीच्या उंबरठय़ावर होते आणि २०१८मध्ये त्यांच्याकडून त्याच दर्जाचा खेळ अपेक्षित करणे हे जोखमीचे ठरेल. रशियातील वातावरणाचा आणि विश्वविजेतेपदाच्या दबावात खेळण्याचा अनुभव मिळावा म्हणून लो यांचा निर्णय योग्य ठरतो. त्यावर या खेळाडूंनी जेतेपदाची मोहर उमटवून फुकट सल्ला देणाऱ्यांना आणि प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना कृतीतून चपराक लगावली.

विश्वविजेतेपदावर विराजमान असलेल्या संघाने पाठोपाठ कॉन्फेडरेशन चषक जिंकण्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळे या युवा खेळाडूंच्या नावावर एक विक्रमच नोंदवला गेला. बेंजामिन हेन्रिक्स, निक्लास स्युले, लियॉन गोरेत्झका, टिमो वेर्नेर आणि लार्स स्टिंडल यांनी आपल्या कामगिरीने सर्वाना अवाक केले. कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेच्या अंतिम फेरीत ज्या प्रकारे या सर्वानी अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या चिलीचे आक्रमण थोपवले, ती कामगिरी अविश्वसनीयच म्हणावी लागेल. या युवा जर्मन संघातील बरेच खेळाडू पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पध्रेतील संघातही कदाचित दिसतील. मॅन्युएल न्यूयर, मॅट्स हृामेल्स, जेरॉम बोएटेंग, बेनेडिक्ट हॉवेडेस, ज्युलियन वेइग्ल, सॅमी खेदिरा, टोनी क्रूस, लॅकी गुंडोगन, मेसूट ओझील, मारियो गोत्झे, मार्को रेयूस, लेरॉय सॅन आणि थॉमस म्युलर या विश्वविजेत्या खेळाडूंना विश्रांती देऊन प्रशिक्षक लो यांनी दुसऱ्या फळीतील खेळाडूंची चाचपणी करण्याचा निर्णय घेतला. आक्रमक आणि बचाव या दोन्ही कसोटय़ा त्यांनी उत्तम गुणांनी उत्तीर्ण केल्या. गोरेत्झका (मध्यरक्षक), स्टिंडल आणि वेर्नेर (दोघेही आक्रमणपटू) यांनी स्पध्रेत सर्वाधिक प्रत्येकी ३ गोल केले. स्पध्रेतील एकूण ४३ पैकी १२ गोल्स जर्मनीच्या खेळाडूंच्या नावावर आहेत.

बरोबर ४८ तासांपूर्वी पोलंड येथे झालेल्या २१ वर्षांखालील युरोपियन अजिंक्यपद स्पध्रेतही जर्मनीच्या युवा संघाचे वर्चस्व राहिले. त्यांनी या स्पध्रेत जेतेपदाची माळ पटकावून जर्मनी फुटबॉलच्या उज्ज्वल भविष्याची प्रचीती दिली. जुने जातील आणि त्यांची जागा घ्यायला नवीन खेळाडू तयारही असतील, परंतु अनुभवी खेळाडूंच्या दर्जात्मक खेळासारखा खेळ त्यांच्याकडून होईलच असे नाही. त्यामुळे भविष्याचा विचार करता दुसरी फळी निर्माण करण्याची गरज ही सर्वच संघांना पडते. फक्त योग्य वेळी त्या प्रक्रियेला सुरुवात करणे महत्त्वाचे आहे आणि लो यांनी ती केली आहे. २०१८च्या विश्वचषक स्पध्रेत जेतेपद कायम राखण्यात जर्मनी यशस्वी होईल की नाही, हे येणारा काळच सांगेल. मात्र, त्यापुढील विश्वचषकात अनेक नवीन चेहरे संघात पाहायला मिळतील आणि त्यात कॉन्फेडरेशन आणि २१ वर्षांखालील युरोपियन अजिंक्यपद स्पध्रेच्या विजेत्या संघातील बरेच खेळाडू असतील हे नक्की. जर्मनीच्या फुटबॉल विश्वात वाहणारी ही नव्याची नांदी अशीच कायम राहिली, तर फुटबॉल विश्वातील त्यांच्या मक्तेदारीला धक्का पोहोचवण्यात कोणालाही यश मिळणार नाही, हे निश्चित.

मेसूट ओझील व थॉमस म्युलर यांना धोका

पोलंड येथे झालेली २१ वर्षांखालील युरोपियन अजिंक्यपद स्पर्धा आणि रशियात झोलेली कॉन्फेडरेशन चषक स्पर्धा यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे जर्मनी. अवघ्या ४८ तासांत या दोन्ही देशांमध्ये जर्मनीच्या युवा आणि वरिष्ठ संघांनी जेतेपदाचा चषक उंचावला. विश्वविजेत्या जर्मनीच्या संघातील बऱ्याच अनुभवी खेळाडूंना कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेतून विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे युवकांनी मिळालेल्या संधीचे सोने करून आगामी विश्वचषक स्पध्रेसाठी दावेदारी सांगितली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे वरिष्ठ खेळाडूंचे संघातील स्थान डळमळीत होण्याची चर्चा रंगली आहे. जर्मनीचे संघ व्यवस्थापक ऑलिव्हर बेहरेफ यांनी कॉन्फेडरेशन चषक स्पध्रेच्या विजेत्या संघातील १० खेळाडू वरिष्ठ संघात स्थान मिळवू शकतील, असे सूतोवाच केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर मेसूट ओझील, सॅमी खेदिरा, थॉमस म्युलर, मार्को रेयूस, लॅकी गुंडोगन, मारियो गोत्झे, अँड्रे स्कुरल, बेनेडिक्ट हॉवेडेस, इर्मे कॅन व मारियो गोमेझ यांच्या स्थानाला धोका पोहोचू शकतो.

स्वदेश घाणेकर

swadesh.ghanekar@expressindia.com