Heated Exchange Between Joe Root and Prasidh Krishna Video: इंग्लंडच्या फलंदाजांनी बॅझबॉल शैलीत फलंदाजी करत पहिल्या डावात भारताच्या गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण आकाशदीपने डकेटला बाद करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. तर दुसऱ्या सत्रात प्रसिध्द कृष्णा आणि जो रूट यांच्यात वाद झाला. नेहमी शांत दिसणारे हे दोन्ही खेळाडू एकमेकांशी चांगलेच भिडले. तर रूट स्पष्टपणे प्रसिध्दला शिवीगाळ करताना दिसला.
इंग्लंडच्या सलामीवीरांनी ओव्हल कसोटीत वादळी फटकेबाजी करत धावा केल्या. डकेट आणि क्रॉली यांनी पहिल्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी करत १६ षटकांत १०९ धावा कुटल्या. पण आकाशदीपने डकेटला बाद करत संघाला पहिली विकेट मिळवून दिली. यानंतर दुसऱ्या डावात प्रसिद्ध कृष्णाने अर्धशतकी खेळी केलेल्या जॅक क्रॉलीला झेलबाद करत दुसरी विकेट मिळवली. यानंतर फलंदाजीला आलेल्या जो रूटसह प्रसिध्द कृष्णाची बाचाबाची झाली.
प्रसिध कृष्णाने २२ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर सलामीवीर जॅक क्रॉलीला झेलबाद केलं. यानंतर रूट गोलंदाजीला आला. प्रसिधने त्यानंतर पुढच्या चारही चेंडूंवर एकही धाव दिली, यादरम्यान त्याने नो बॉलही टाकला होता. यानंतर पाचव्या चेंडूवर रूट बाद होता होता थोडक्यात वाचला. पण रूटने अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत याचा बदला घेतला. यानंतर हा वाद झाला.
जो रूट आणि प्रसिध कृष्णामध्ये कशावरून झाला वाद?
प्रसिधने टाकलेला चेंडू रूटच्या बॅटच्या एकदम जवळून गेला आणि रूट गडबडला. यानंतर प्रसिध रनअप पूर्ण करत त्याच्याजवळ गेला आणि त्याला काहीतरी बोलला. यावर रूट वैतागला व पुढे येऊन प्रसिधला सुनावलं. यानंतर पुढच्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर पुन्हा एकदा रूट आणि प्रसिधमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर रूट पुढे जात असताना मागे वळून रागाच्या भरात त्याला शिव्या घालताना दिसला.
२४ व्या षटकात प्रसिध पुन्हा गोलंदाजीला आला. पण यापूर्वी पंच कुमार धर्मसेना यांनी प्रसिध कृष्णा आणि टीम इंडियाशी या वादाबाबत चर्चा केली. खेळाडूंचे हावभाव पाहता पंच प्रसिधला त्याची चूक असल्याचं सांगत आहेत आणि तो देखील सफाई देताना दिसत आहे. २४व्या षटकात यानंतरही हा वाद कायम होता.
रूटने प्रसिधच्या दुसऱ्याच चेंडूवर चौकार लगावला. यानंतर पुढच्या चेंडूवर रूटला प्रसिधने चकित केलं. त्यानंतर दोघांनीही एकमेकांकडे जळता कटाक्ष टाकत पाहिलं. चौथ्या चेंडूवर विकेटचं अपील करण्यात आलं, पण पंचांनी नाबाद दिलं. त्या षटकात प्रसिधने फक्त १ धाव दिली आणि काही वेळाने हा वाद शांत झाला.