Joe Root Surpasses Sachin Tendulkar IND vs ENG: इंग्लंडचा सर्वात अनुभवी कसोटी फलंदाज जो रूट एकामागून एक मोठे विक्रमी आपल्या नावे करत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रूटने सचिन तेंडुलकरला एका खास यादीत मागे टाकण्यात यश मिळवले. कसोटी क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रूट आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. याशिवाय त्याने अजून एक विक्रम आपल्या नावे केला आहे.

जो रूट मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर पायचीत झाला. यासह रूट २९ धावा करत बाद झाला. रूटने चौथ्या कसोटीत १३ हजार धावांचा पल्ला गाठत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. या यादीत आता त्याच्या पुढे फक्त सचिन तेंडुलकर आहे. पाचव्या कसोटीत रूटने २९ धावांच्या खेळीत २ विक्रम केले आहेत.

घरच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकरला मागे टाकण्यासाठी रूटला २२ धावांची आवश्यकता होती. सिराजच्या ३३व्या षटकात चौकार लगावत हा विक्रम त्याने आपल्या नावे केली. जो रूट आता घरच्या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सचिनला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

सचिन तेंडुलकरने त्याच्या कसोटी कारकिर्दीत घरच्या मैदानावर एकूण ७२१६ धावा केल्या होत्या, तर रूटने आता घरच्या मैदानावर एकूण ७२२९ कसोटी धावा केल्या आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग अव्वल स्थानावर आहे. ज्याने घरच्या मैदानावर कसोटी सामन्यांमध्ये एकूण ९२ सामन्यांमध्ये ७२५८ धावा केल्या आहेत. आता रूटला पाचव्या कसोटीत पॉन्टिंगला मागे टाकण्याची संधी आहे.

घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी धावा करणारे खेळाडू

रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) – ७२५८ धावा (९२ कसोटी सामने)

जो रूट (इंग्लंड) – ७२२९ धावा (८४ कसोटी सामने)*

सचिन तेंडुलकर (भारत) – ७२१६ धावा (९४ कसोटी सामने)

महेला जयवर्धने (श्रीलंका) – ७१६७ धावा (८१ कसोटी सामने)

जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – ७०३५ धावा (८८ कसोटी सामने)

घरच्या मैदानावर भारताविरूद्ध २ हजार धावा करणारा रूट पहिला इंग्लंडचा फलंदाज

जो रूट हा इंग्लंडसाठी घरच्या मैदानावर भारताविरुद्ध २ हजार किंवा त्याहून अधिक कसोटी धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. भारताविरुद्ध अशी कामगिरी करणारा रूट हा जागतिक क्रिकेटमधील पहिला खेळाडू देखील आहे. आतापर्यंत, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त दोनच खेळाडू असे आहेत ज्यांनी घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध २ हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. रूटच्या आधी, सर डॉन ब्रॅडमन यांनी ही कामगिरी केली होती, ज्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये एकूण २३५४ धावा केल्या होत्या.