लागोपाठ दोन्ही सामन्यांत दणदणीत विजय मिळवल्यानंतर सुल्तान जोहोर बाहरू चषक हॉकी स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय हॉकी संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. ग्रेट ब्रिटनकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानचा ६-० तर यजमान मलेशियाचा ४-२ असा पाडाव केला होता. या विजयामुळे अंतिम फेरीत मजल मारण्याच्या भारताच्या आशा उंचावल्या आहेत. पाचव्या आणि अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना करताना भारताची मदार हरमनप्रीत सिंग आणि वरुण कुमार यांच्यावर असणार आहे. हरमनप्रीतने मलेशियाविरुद्ध हॅट्ट्रिक साजरी केली होती. परविंदर सिंग आणि अरमान कुरेशी यांनीही आक्रमक खेळी करत गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या होत्या. त्यामुळे या सर्वाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे.
कर्णधार हरजीत सिंगने मधल्या फळीत खेळताना चेंडूवर ताबा मिळवत गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. या सामन्याविषयी भारताचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग म्हणाले, ‘‘मैदानावर आमची रणनीती यशस्वी ठरली आहे. मिळालेल्या संधीचा आम्ही पुरेपूर फायदा उठवला आहे. ऑस्ट्रेलिया हा बलाढय़ संघ असून त्यांचा पाडाव करणे सोपे नाही. पण भारताचे खेळाडू चांगल्या फॉर्मात आहेत.’’