रविवारी जपान ग्रा.प्रि. शर्यतीमध्ये ज्युलेस बिआंची याची कार ट्रॅक्टर क्रेनला धडकल्यामुळे झालेल्या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तो सध्या जपानमधील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. त्याला मृत्यूच्या उंबरठय़ापर्यंत नेणाऱ्या या भीषण अपघाताचे अस्वस्थ करणारे चित्रण आता उपलब्ध झाले आहे.
२५ वर्षीय बिआंची याची तब्येत अजूनही गंभीरच परंतु स्थिर आहे. रविवारी सुझुका सर्किटवर झालेल्या या अपघातानंतर त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याच्या अपघाताचे चित्रण ‘यू-टय़ूब’वर ठेवण्यात आले आहे. बिआंची चालवत असलेली मॉरुसिया कार त्याचे नियंत्रण सुटल्याने पिवळ्या रंगाच्या ट्रॅक्टर-क्रेनला जोरात धडकली आणि क्षणार्धात कार आगीच्या ज्वाळांमध्ये वेढली गेली. ‘अजि म्या मृत्यू पाहिला’ या ओळींची साक्षात जाणीव व्हावी, असेच हे चित्रण आहे. ही ट्रॅक्टर-क्रेन आधीच्या शर्यतीदरम्यान त्याच जागेवर अपघातग्रस्त झालेली कार उचलण्यासाठी तिथे आली होती.
दरम्यान, माजी विश्वविजेता शर्यतपटू अ‍ॅलन प्रोस्टने या अपघातासाठी संयोजकांना जबाबदार धरले आहे. संयोजनातील त्रुटींमुळेच हा अपघात घडल्याची टीका त्याने केली आहे. ‘फॉम्र्युला-वन सर्किटवर सुरक्षा कार सोबत घेतल्याशिवाय क्रेन यायलाच नको होती. ही मोठी चूक असून, ती पुन्हा घडता कामा नये. शर्यतीच्या संचालकाची ही चूक आहे की, अन्य कुणाची? आधीच्या शर्यतीतील अपघातग्रस्त कार तेथून हलवण्याचा निर्णय कुणी घेतला ते सांगता येणार नाही. मात्र हा निर्णय चुकीचा होता हे नि:संशय, असे प्रोस्ट याने म्हटले आहे.
दरम्यान, बिआंचीचे वडील फेलिपे आणि आई ख्रिस्टिन मंगळवारी जपानमधील रुग्णालयात येऊन पोहोचले. गेल्या वर्षी अपघातात जखमी झालेल्या मायकेल शूमाकरवर उपचार करणारे फ्रान्समधील ख्यातनाम शल्यविशारद डॉ. गेरार्ड सेलांट यांनासुद्धा तेथे पाचारण करण्यात आले आहे. बिआंचीचा एजंट निकोलस टॉड आणि अनुभवी शर्यतपटू फेलिपे मासासुद्धा जपानमध्ये पोहोचले आहेत.