पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज जुनेद खानच्या गुडघ्याला झालेली दुखापत अपेक्षेपेक्षा जास्त गंभीर स्वरूपाची असून, त्याला क्रिकेटला अलविदा करावा लागण्याची शक्यता आहे.
दुबई येथे ऑस्ट्रेलियाबरोबर सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वीच जुनेद याला सरावाच्या वेळी दुखापत झाली. त्यामुळे त्याला मायदेशी परतावे लागले. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे वैद्यकीय सल्लागार डॉ. सोहेल सलीम यांनी सांगितले, ‘‘सुरुवातीला जुनेदची दुखापत फारशी गंभीर वाटली नाही. मात्र जेव्हा त्याच्या गुडघ्याचे स्कॅनिंग करण्यात आले, त्या वेळी ही दुखापत गंभीर असल्याचे दिसून आले. तसेच पायातील हाडांनाही मोठी दुखापत झाली आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला न्यूझीलंड दौऱ्यात सहभागी होता येणार नाही. कदाचित त्याला क्रिकेटलाही रामराम घ्यावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.’’
दरम्यान, दुबईतील मालिकेतून दुखापतीमुळे मायदेशी परत आलेल्या वहाब रियाझ हा लवकरच तंदुरुस्त होईल अशी आशा आहे. त्याच्यावर नुकतीच छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याने सरावही सुरू केला आहे, असे सलीम यांनी सांगितले.