हरजित सिंगचा निर्धार

चढ-उतारांचे आयुष्य हे कुणालाही चुकलेले नाही.. आयुष्याचा तराजू हा कधी सुखाच्या, तर कधी दु:खाच्या बाजूने झुलता असतो. पण, अशा परिस्थितीतही संघर्ष करून ध्येयनिश्चितीच्या दृष्टीने वाटचाल करणे हे परमकर्तव्य.. अशाच सुख-दु:खाच्या दोलायमान परिस्थितीतून वाट काढत हरजित सिंगने भारतीय हॉकी क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये पार पडलेल्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पध्रेत ऐतिहासिक जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी हरजितने पार पाडली, परंतु हॉकीत कारकीर्द घडवण्याच्या निर्णयापासून ते इथपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासात त्याने अनेक खाचखळग्यांना हुलकावणी दिली. एक काळ असा आला होता की, हॉकीला रामराम करण्याचा निर्णय मनात डोकावत होता. मात्र, मोठय़ा जिद्दीने हरजितने कनिष्ठ गटात दबदबा निर्माण केला आहे.

‘२००४ साली मी हॉकी खेळायला सुरुवात केली. वडील ट्रकचालक, आई गृहिणी आणि मोठा भाऊ असा आमचा परिवार. सुरुवातीला घरच्यांनी विरोध केला, परंतु खेळातील प्रगती पाहता त्यांचा विरोध मावळला, पण वडिलांच्या कमाईत घरखर्च चालणे कठीण होते आणि त्यात माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागत असलेला अतिरिक्त खर्च. त्यामुळे हॉकी सोडण्याचा विचार सतत येत होता. मात्र, २०१६ हे वर्ष आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. ‘उदयोन्मुख खेळाडू’चा पुरस्कार मला मिळाला आणि त्यासोबत काही लाखांचा धनादेशही. ही रक्कम माझ्या कुटुंबीयांसाठी फार मोठी होती.

हा धनादेश माझ्यासाठी प्रेरणादायी ठरला,’ असे हरजित सांगत होता.

या पुरस्कारानंतर हरजितची कनिष्ठ हॉकी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने जवळपास १५ वर्षांनंतर विश्वचषक उंचावला. याविषयी हरजित म्हणाला की, ‘विश्वचषक जिंकण्याचा संपूर्ण संघाचा निर्धार होता आणि त्यात यशस्वी झाल्याचा सर्वाना खूप खूप आनंद आहे. आता आमच्या कारकीर्दीला नवीन दिशा मिळाली आहे. हॉकीलाही चांगले दिवस येऊ लागले आहेत. आम्ही कुठे बाहेर गेल्यावर लोक आम्हाला ओळखू लागले आहेत. ही भावना शब्दात सांगणे अवघड आहे. आता मागे वळून पाहणार नाही.’

हॉकी इंडिया लीगमध्ये हरजित दिल्ली वेव्हरायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. हॉकी इंडिया लीगबद्दल तो म्हणाला की, ‘युवा खेळाडूंसाठी हे योग्य व्यासपीठ आहे. केवळ भारतीयच नव्हे, तर परदेशातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत व विरुद्ध खेळण्याची संधी आम्हाला मिळते. त्यामुळे खेळातही बरीच सुधारणा करणे सोपे जाते. आता पुढील वर्षी होणाऱ्या वरिष्ठ विश्वचषक स्पध्रेतील संघातील स्थान खुणावत आहे.’