उत्कंठापूर्ण लढतीत १-३ अशा पिछाडीवरून दक्षिण कोरियाने भारताला ३-३ असे बरोबरीत रोखले आणि कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे अनिवार्य होते. मात्र साखळीमधील अखेरच्या लढतीमधील बरोबरीमुळे गोलसंख्येच्या सरासरीत सरस ठरलेल्या कोरियाने साखळी गटात दुसरे स्थान मिळवले.
या रोमहर्षक लढतीत भारताकडून गुरजिंदर सिंगने ३३व्या व ३४व्या मिनिटाला गोल केले तर सतबीर सिंगने ४५व्या मिनिटाला गोल नोंदविला. दक्षिण कोरियाकडून लिऊ बिओमेरीलने तिसऱ्या मिनिटाला गोल केला. उत्तरार्धात सामन्याच्या ५८व्या व ६०व्या मिनिटाला सेउजोंग युओ याने पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल केले.  
दोन्ही संघांसाठी बाद फेरीच्या दृष्टीने ही लढत अतिशय महत्त्वाची होती. सामन्याच्या प्रारंभापासून कोरियन खेळाडूंनी धारदार आक्रमण केले. तिसऱ्याच मिनिटाला त्यांना पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. त्याचा फायदा घेत लिऊ याने गोल करीत संघाचे खाते उघडले. त्यानंतर भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र त्याचा फायदा घेण्यात त्यांना यश मिळाले नाही. कोरियानेही दोन पेनल्टी कॉर्नर वाया घालवले. मध्यंतरापर्यंत कोरिया आघाडी राखणार असे वाटत असतानाच भारतीय खेळाडूंनी जोरदार आक्रमण केले. ३३व्या व ३४व्या मिनिटाला त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्याचा फायदा घेत गुरजिंदरने गोल केले आणि संघाला मध्यंतराला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात सामन्याच्या ३९व्या मिनिटाला भारताने पेनल्टी कॉर्नर वाया घालविला. तथापि, त्यानंतर सहा मिनिटांनी रमणदीप सिंगच्या पासवर सतबीरने खणखणीत फटका मारून गोल केला आणि संघाला ३-१ असे आघाडीवर नेले. या गोलनंतर भारताने सातत्याने चाली करीत कोरियन खेळाडूंना बचावात्मक खेळ करण्यास भाग पाडले. तथापि, ५८व्या मिनिटाला कोरियाने धारदार आक्रमण करीत पेनल्टी कॉर्नर मिळविला. त्याचा फायदा घेत युओने गोल करीत भारताची आघाडी कमी केली. पुन्हा ६०व्या मिनिटाला कोरियाला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. या वेळीही युओने गोल करीत ३-३ अशी बरोबरी साधली. त्यानंतर भारताने गोल करण्याच्या दोन सोप्या संधी वाया घालवल्या. ३-३ अशा बरोबरीतच सामना संपला.