जागतिक कांस्यपदक विजेत्या ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा जोडीने आगामी उबेर चषक जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील महिलांच्या दुहेरीत चांगली कामगिरी करण्याचा आत्मविश्वास प्रकट केला.
ज्वाला व अश्विनी यांनी २०११मध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. त्यांनी नुकत्याच झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही कांस्यपदक मिळविले होते. १८ मेपासून सुरू होणाऱ्या उबेर चषक स्पर्धेविषयी ज्वाला म्हणाली, ‘‘आमच्याकडून खूप मोठय़ा अपेक्षा आहेत आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी आम्ही कसून तयारी केली आहे. भारताला सर्वोत्तम यश मिळवून देण्याची आमच्यावरील जबाबदारी आम्ही यशस्वीपणे पार पाडू, अशी खात्री आहे. वैयक्तिक अजिंक्यपद स्पर्धेपेक्षा सांघिक स्पर्धा ही खूप वेगळी असते. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत असल्याचा आम्हाला नितांत अभिमान आहे.’’
ज्वालाच्या मताशी सहमती दर्शवत अश्विनी म्हणाली, ‘‘वैयक्तिक स्पर्धामध्ये आम्ही जरी भारताचे प्रतिनिधित्व करत असलो तरी तेथील हार-जीत ही देशासाठी महत्त्वाची नसते. मात्र सांघिक गटाच्या स्पर्धामध्ये खेळत असताना आमच्या कामगिरीचा देशाच्या यशापयशावर थेट परिणाम होत असतो. साहजिकच संघासाठी खेळताना अधिक जबाबदारीने खेळावे लागते. तेथे संघाचा एक घटक म्हणूनच आम्हाला विचार करावा लागतो.’’