२०११ विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून देणारी ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडी पुन्हा एकत्र खेळणार असल्याची चिन्हे आहेत. लंडन ऑलिम्पिकनंतर ज्वालाने प्रदीर्घ काळ विश्रांतीचा निर्णय घेतल्याने अश्विनीने प्रज्ञा गद्रेसह खेळायला सुरुवात केली होती. मात्र आयबीएल स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धात्मक बॅडमिंटनमध्ये परतणाऱ्या ज्वालाने अश्विनीसह नवीन इनिंग्ज खेळण्याचे निश्चित केल्याचे समजते. मात्र कोणत्या स्पर्धेपासून एकत्र खेळणार किंवा अन्य तपशील सांगण्यास दोघींनीही नकार दिला.
‘ज्वाला आणि मी पुन्हा एकत्र खेळू शकतो. याआधीही आम्ही चांगली कामगिरी केली आहे. मात्र आता याबाबत मला काही बोलायचे नाही,’ असे अश्विनीने स्पष्ट केले. नव्या साथीदारासह मी खेळू शकते. प्रदीर्घकालीन भवितव्याबाबत मी काही सांगू शकत नाही. याबाबत बोलणी सुरू आहेत, काय होते ते कळेलच, असे ज्वालाने सूचित केले.
माझी कामगिरी चांगली होत आहे, माझ्या प्रदर्शनाबाबत मी समाधानी आहे. काही वेळा तुम्हाला नशिबाची साथ मिळणे आवश्यक असते. विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत थायलंडच्या रत्नाचोक इन्थॅनॉनने ली झेरुईवर केलेली मात हे याचे उत्तम उदाहरण आहे. चीनच्या खेळाडूंना नमवणे सोपी गोष्ट नाही. काही वेळेला नशिबाने तुम्ही चीनच्या खेळाडूंवर मात करू शकता. ते कधीच हार मानत नाहीत. कोणत्याही क्षणी ते सामन्यात परतू शकतात.
सायना नेहवाल, भारतीय बॅडमिंटनपटू
या स्पर्धेत चांगल्या कामगिरीने ठसा उमटवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. गुआंगझो येथे झालेली विश्व अजिंक्यपद स्पर्धा माझी पहिलीच स्पर्धा होती. चीनच्या दोन मातब्बर खेळाडूंना नमवल्याचे समाधान आहे. कांस्यपदकाने मला अतिशय आनंद झाला आहे. अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झाल्याने आनंद द्विगुणित झाल्याचे सिंधूने सांगितले. आयबीएल स्पर्धेचे स्वरूप वेगळे आणि आकर्षक आहे. या स्पर्धेत खेळताना भरपूर आनंद मिळेल.
– पी.व्ही. सिंधू, भारतीय बॅडमिंटनपटू