india tour of australia 2020 : हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघानं पाचव्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरलं. या यशानंतर रोहित शर्माकडे भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवावी या मागणीनं जोर धरला आहे. या मागणीमध्ये अनेक दिग्गज आणि क्रीडा तज्ज्ञांचा समावेश आहे. मात्र, विश्वविजेता कर्णधार कपीलदेव रोहित शर्माला टी-२० चा कर्णधार करण्याविरोधात आहेत. यामागील तसं कारणही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

भारतीय माजी कर्णधार कपील देव तिन्ही प्रकरात वेगवेगळे कर्णधार करण्याच्याविरोधात आहेत. त्यांच्यामध्ये तिन्ही संघात जवळपास ७०-८० टक्के खेळाडू सारखेच आहेत. त्यामुळे तिन्ही प्रकारात एकच कर्णधार असावा. कपिल देव यांच्यामते भारतीय संघाचे दोन कर्णधार नसावेत.

कपिल देव म्हणाले की, ” आपल्या क्रीडा संस्कृतीत अशा गोष्टी होत नाहीत. आपण एखाद्या कंपनीचे दोन सीईओ करतो का? नाही. जर विराट कोहली टी-२० खेळत आहे आणि तो चांगली कामगिरी करत असेल तर त्यालाच कर्णधार राहू द्या. पण मी पाहू इच्छितो की इतर खेळाडूंनीही विराटसारखी सातत्यानं चांगली कामगिरी करावी आणि पुढे यावं. हे शक्य आहे.”

कपिल देव यांच्यामते कसोटी आणि मर्यादित षटकांच्या संघासाठी वेगवेगळे कर्णधार केल्यास संघासाठी घातक ठरेल शिवाय वेगळीच समस्या निर्माण होईल. टी-२-, एकदिवसीय आणि कसोटी अशा सर्व प्रकारच्या संघात आपले ७० ते ८० टक्के खेळाडू सारखेच आहेत. त्यांना वेगवेगळ्या विचारांचे कर्णधार आवडणार नाहीत. जर तुम्ही दोन कर्णधार ठेवले तर खेळाडू विचार करतील की, हा माझा कसोटी संघाचा कर्णधार आहे. मी याला नाराज नाही करु शकत. त्यामुळे संघातील समतोल ढासळेल.

यावेळी कपिल देव यांनी आयपीएलमधील वेगवान गोलंदाजाबाबतही आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, ” सामन्यातील पहिला चेंडू क्रॉस सीम नाही टाकू शकत. आयपीएलमध्ये खेळाडूंनी दाखवून दिलं की वेगापेक्षा स्वींग महत्वाचा आहे. टी. नटराजन आयपीएलमधील माझा हिरो आहे. या युवा निडर खेळाडूनं खूप यॉर्कर चेंडू फेकले.”

कपिल देव म्हणाले की, शामी आणि बुमराह यांची गोलंदाजी पाहायला आवडते. आज भारतीय संघ वेगवान गोलंदाजीच्या जोरावर जिंकू शकतो हे पाहून बरं वाटतं. आपले गोलंदाज २० विकेट घेण्यास सक्षम आहेत. आपल्याकडे कुंबळे-भज्जीसारखे दर्जेदार फिरकी गोलंदार होते. बुमराह आणि शामी यांनी वेगवान गोलंदाजाची कमी भरून काढली आहे. उसळत्या मैदानावरही भारतीय गोलंदाजी आता प्रभावी होत आहे.