Robin Uthappa fraud case: भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) प्रकरणी फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. २१ डिसेंबर रोजी भविष्य निर्वाह निधीचे क्षेत्रीय आयुक्त शदक्षारा गोपाल रेड्डी यांनी पुलकेशीनगर पोलिसांना अटकेचे आदेश दिले होते. रॉबिन उथप्पाने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेत अटकेला आव्हान दिले. आज उच्च न्यायालयाने अटकेला स्थगिती दिल्यामुळे रॉबिन उथप्पाला दिलासा मिळाला आहे.

रॉबिन उथप्पाची सेंच्युरीयस लाइफस्टाइल ब्रँड प्रा. लि. नावाची खासगी कंपनी आहे. या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीचे योगदान कापले जात होते. मात्र ते पैसे ईपीएफकडे जमाच केले गेले नाहीत. त्यामुळे २३ लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याचा आरोप रॉबिन उथप्पावर ठेवण्यात आला होता. ही रक्कम भरण्यासाठी उथप्पाला २७ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती.

रॉबिन उथप्पाने आरोपाबाबत काय म्हटले?

सदर आरोप झाल्यानंतर रॉबिन उथप्पाने इन्स्टाग्रामवर एक निवेदन सादर केले. यात तो म्हणाला, पीएफ थकविल्याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. स्ट्रॉबेरी लेन्सेरिया प्रायव्हेट लिमिटेड, सेंटोरस लाईफस्टाईल ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बेरीझ फॅशन हाऊस या कंपन्यांशी माझे थेट संबंध नाहीत. २०१८-१९ मध्ये मी या कपन्यांना कर्ज दिल्यामुळे मला संचालक म्हणून नेमण्यात आले होते. पण कंपनीतील दैनंदिन कामकाजात माझा काहीच सहभाग नव्हता. मी क्रिकेटपटू, समालोचक, निवेदक असल्यामुळे कंपनीतील दैनंदिन कारभारात कधीही लक्ष घातलेले नाही.

काही वर्षांपूर्वीच मी या कंपन्यांतून संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे पैसे भरलेले नाहीत, याची मला नंतर माहिती मिळाली. ईपीएफची नोटीस प्राप्त झाल्यानंतर माझ्या लिगल टीमने त्याची दखल घेऊन योग्य ते उत्तर दिलेले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रॉबिन उथप्पाची कारकिर्द

रॉबिन उथप्पा २००४ मध्ये भारताने जिंकलेल्या १९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट संघाचा सदस्य होता. यानंतर दोन वर्षांनी त्याला भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. तो भारताकडून ४६ एकदिवसीय आणि १३ टी-२० सामने खेळला आहे. २००७ मध्ये भारताने पहिला टी-२० विश्वचषक जिंकलेल्या दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.