Pakistan Shaheens vs Bangladesh A: ऑस्ट्रेलियामध्ये टॉप एंड टी -२० मालिकेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत पाकिस्तानचा देखील समावेश आहे. या स्पर्धेतील पहिला सामना १३ ऑगस्टला पार पडला. या सामन्यात पाकिस्तान शाहीन्स संघाचा सामना बांगलादेश अ संघाविरुद्ध पार पडला. या सामन्यात पाकिस्तान शाहीन्स संघाची फलंदाजी सुरू असताना एक फलंदाज अशा पद्धतीने धावबाद झाला, जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
पाकिस्तान शाहीन्स आणि बांगलादेश अ या दोन्ही संघातील सामना डार्विनच्या टीआयओ स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात फलंदाजी करताना पाकिस्तान शाहीन्सच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात केली होती. पाकिस्तानकडून सलामीला आलेल्या ख्वाजा नफे आणि यासिर खान यांनी दमदार अर्धशतकं झळकावली. या अर्धशतकांच्या बळावर दोघांनी शतकी भागीदारी पूर्ण केली.
दोन्ही फलंदाजांची शतकाच्या दिशेने वाटचाल सुरू होती. त्यावेळी असं काही घडलं जे पाहून ख्वाजा नफे संताप व्यक्त करताना दिसून आला. तर झाले असे की, पहिल्या डावात गोलंदाजी करताना बांगलादेश अ कडून १२ वे षटक टाकण्यासाठी हसन महमूद गोलंदाजीला आला. ज्यावेळी तो गोलंदाजीला आला त्यावेळी पाकिस्तानचा संघ मजबूत स्थितीत होता. पाकिस्तानने ११८ धावांपर्यंत मजल मारली होती. या षटकातील पहिलाच चेंडू यासिर खानच्या पॅडला जाऊन लागला. त्यावेळी नॉन स्ट्राईकला असलेला ख्वाजा नफे धाव घेण्यासाठी धावला. तो धावला पण स्ट्राईकला असलेल्या यासिरने धाव घेण्यास नकार दिला.
ख्वाजा नफेला एक धाव सहज मिळू शकते, असं वाटलं होतं. त्यामुळे तो वेगाने धावून अर्ध्या क्रिझपर्यंत पोहोचला. पण यासिरने धाव घेण्यास नकार दिल्यामुळे त्याला विकेट वाचवण्यासाठी माघारी परतावं लागलं. त्यावेळी यष्टिरक्षकाने गोलंदाजी करत असलेल्या हसन महमूदकडे वेगाने चेंडू फेकला आणि ख्वाजा नफेला धावबाद केलं.
धावबाद झाल्यानंतर ख्वाजा नफेला राग अनावर झाला. त्याने रागात बॅट आपटली. यासह यासिरवर संताप व्यक्त करताना दिसून आला. ख्वाजा नफेच्या मते, धाव घेण्याची संधी होती. पण यासिरने प्रयत्न सुद्धा केला नाही. पण या ठिकाणी यासिर योग्य होता, कारण चेंडू जवळ असतानाही ख्वाजा नफे धाव घेण्यासाठी धावला. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.