ऋषिकेश बामणे, मुंबई

अत्यंत हलाखीची परिस्थिती, १५ बाय १०च्या खोलीत आठ जणांचे वास्तव्य, वडील ट्रकचालक तर मोलमजुरी करणाऱ्या आईमुळे घराचा चरितार्थ चालत असतानाही बदलापूरच्या रेश्मा राठोडने खो-खो खेळात उत्तुंग भरारी घेण्याचे स्वप्न उराशी बाळगले. प्रत्येक क्षणाला तारेवरची कसरत करीत रेश्माने भोपाळ येथे झालेल्या कुमार-कुमारी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत प्रतिष्ठेचा जानकी पुरस्कार पटकावतानाच महाराष्ट्राला जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्यासाठी रेश्मा सज्ज झाली आहे.

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
Loksatta lokshivar Agriculture Business Milk business animal husbandry
शेती नसणाऱ्याची धवलक्रांती!
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!

मला सर्व सोयी-सुविधा मिळाव्या याकरिता आई-वडिलांनी खूप कष्ट सोसले. आता माझ्या खेळामार्फत त्यांना सुख-समृद्धीचे दिवस दाखवायचे आहेत, असा संकल्प भारताची युवा खो-खोपटू रेश्मा राठोडने मनाशी बांधला आहे. बदलापूर येथील शांतीनगर परिसरात एका छोटय़ाशा खोलीत आई-वडील, चार भावंडे, वहिनी व भाची अशा एकूण आठ जणांसह राहणाऱ्या रेश्माने वयाच्या १०व्या वर्षी खो-खो खेळण्यास सुरुवात केली. शिवभक्त विद्यामंदिर शाळेकडून खेळणाऱ्या रेश्माने शालेय स्तरावर अनेक पुरस्कारांवर नाव कोरले. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल ती म्हणते, ‘‘शाळेत असताना माझ्या वरच्या वर्गातील मुलींना मी मैदानावर खो-खो खेळताना पाहायचे. तेथूनच मला खो-खोविषयी आवड निर्माण झाली. प्रशिक्षक नरेंद्र मेंगळ आणि पंढरीनाथ म्हस्कर यांच्या मार्गदर्शनामुळे माझी शालेय संघात निवड झाली व तेथूनच माझ्या कारकीर्दीने वेग पकडला.’’

रेश्माचे वडील सुभाष हे ट्रॅक्टरचालक असून तिची आई घमीबाई मजुरीचे काम करते. मोठा भाऊ लक्ष्मण हा जिल्हास्तरीय कबड्डीपटू म्हणून स्वत:चे नशीब अजमावत आहे. रेश्मा सध्या आदर्श महाविद्यालयात १२वीच्या इयत्तेत शिकत असून अभ्यासाबरोबरच स्वत:च्या सरावाच्या तालमीही योग्यपणे सांभाळत आहे. जानकी पुरस्कार मिळवला असला तरी, आयुष्यात अद्याप बराच मोठा पल्ला गाठण्याची रेश्माची इच्छा आहे. ‘‘सविता घाणेकर, मीनल भोईर यांसारख्या खो-खो खेळाडूंना मी आदर्श मानते. त्यांनी शिवछत्रपती, राणी लक्ष्मीबाई अशा प्रतिष्ठेच्या पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. मलाही खो-खोमध्ये अशीच कामगिरी करायची असून त्यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावणार आहे. आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळेच मी आज खो-खो खेळत आहे.’’ असे रेश्मा म्हणाली.

लहानपणापासूनच परिस्थितीची जाणीव -मेंगळ

रेश्माने कमी वयात खो-खो खेळात उल्लेखनीय कामगिरी केली असून तिला तिच्या आई-वडिलांनी सोसलेल्या हालअपेष्टांची जाणीव आहे, असे मत रेश्माचे प्रशिक्षक नरेंद्र मेंगळ यांनी व्यक्त केले. ‘‘रेश्माने आजपर्यंत एकदाही सराव चुकवलेला नाही किंवा खेळण्यास आळस दाखवलेला नाही. संघांसाठी ती दुहेरी भूमिका बजावण्यासाठी नेहमीच तयार असते. तिच्याकडे पाहून असंख्य मुलींना या खेळाकडे वळण्याची प्रेरणा मिळत आहे,’’ असे मेंगळ म्हणाले. मेंगळ आणि म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवभक्त विद्यामंदिर खो-खो प्रशिक्षण केंद्रात सोमवार ते शनिवार सराव शिबीर सुरू असते. सविता घाणेकर, मीनल भोईर यांची सुरुवातही याच प्रशिक्षण केंद्रातून झाली हे विशेष.