Kieron Pollard Record: वेस्टइंडिजचा माजी फलंदाज कायरन पोलार्ड हा कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत ट्रिनबागो नाईट रायडर्स संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. वयाच्या ३८ व्या वर्षीही त्याच्या फलंदाजीतील धार कमी झालेली नाही. त्याच्या दमदार फलंदाजीच्या बळावर ट्रिनबागो नाईट रायडर्स संघाने ७ गडी राखून दमदार विजयाची नोंद केली. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या बारबाडोस रॉयल्स संघातील फलंदाजांनी २० षटकांअखेर १७८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ट्रिनबागो नाईट रायडर्स संघाकडून निकोलस पूरन आणि कॉलिन मुनरो यांनी अर्धशतकं झळकावली आणि आपल्या संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. यादरम्यान कायरन पोलार्डने टी-२० क्रिकेटमधील मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी
पोलार्डने ट्रिनबागो नाईट रायडर्स संघाकडून फलंदाजी करताना ९ चेंडूत १९ धावा चोपल्या. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार आणि १ षटकार मारला. या सामन्यात फलंदाजीला येण्यापूर्वी त्याला टी-२० क्रिकेटमध्ये १४००० धावांचा पल्ला गाठण्यासाठी अवघ्या १९ धावांची गरज होती. या धावा करताच तो टी-२० क्रिकेटच्या इतिहासात १४००० धावांचा पल्ला गाठणारा दुसराच फलंदाज ठरला आहे. या यादीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत माजी फलंदाज ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. गेलच्या नावे १४५६२ धावा केल्या आहेत. त्यामुळे आता पोलार्डला टी-२० क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचायचं असेल, तर त्याला आणखी ५६२ धावा कराव्या लागणार आहेत.
जगभरातील टी-२० लीग स्पर्धांमध्ये धावांचा पाऊस पाडणारा पोलार्ड कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेतही दमदार फलंदाजी करत आहे. त्याने या स्पर्धेत सेंट लुसिया किंग्ज संघाविरूद्ध फलंदाजी करताना अर्धशतकी खेळी केली होती. या सामन्यात ६५ धावांची तुफानी खेळी करत त्याने संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं होतं.
कायरन पोलार्डने आंतरराष्ट्रीय किकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पण तो जगभरातील टी-२० क्रिकेट लीग स्पर्धा खेळतो. वेस्टइंडिजसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला १०१ टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली. यासह आयपीएल, बीबीएल, बांगलादेश प्रीमियर लीग, दक्षिण आफ्रिका टी-२० लीग आणि पाकिस्तान सुपर लीग या स्पर्धांमध्ये देखील धावांचा पाऊस पाडला. एकूण ७१२ टी-२० सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्याने १४००० धावांचा पल्ला गाठला आहे. यादरम्यान त्याने ६४ अर्धशतकं झळकावली आहेत.