इंग्लिश भूमीवर इंग्लंडवर २-१ अशा फरकाने विजय मिळविल्यानंतर न्यूझीलंडचा आत्मविश्वास दुणावला आहे. आपला हाच फॉर्म चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेत राखून जेतेपदावर दावेदारी करण्याचे किवी संघाचे मनसुबे आहेत. रविवारी न्यूझीलंडचा संघ श्रीलंकेशी भिडणार आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंकेची कामगिरी सरस ठरत आली आहे. मागील ११ सामन्यांपैकी १० सामने श्रीलंकेने जिंकले आहेत. यांपैकी सहा सामने त्यांनी सलग जिंकण्याची किमया साधली आहे. परंतु न्यूझीलंडचे फलंदाज चांगल्या फॉर्मात असल्यामुळे श्रीलंकेला अ-गटातील हा सामना जिंकणे कठीण जाईल. सलामीवीर मार्टिन गप्तीलने इंग्लंडविरुद्ध दोन सलग शतके झळकावण्याची किमया साधली आहे, तर रॉस टेलरने मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली आहेत. कप्तान ब्रॅन्डन मॅक््क्युलमची बॅट तळपल्यास तो कोणत्याही गोलंदाजीच्या माऱ्याला निष्प्रभ करू शकेल.
श्रीलंकेच्या गोलंदाजीची धुरा असेल ती लसिथ मलिंगा आणि न्यूवान कुलसेकरा या वेगवान गोलंदाजांवर. याचप्रमाणे सचित्र सेनानायके, जीवन मेंडिस, रंगना हेराथ या विशेष फिरकी गोलंदाजांवर त्यांची मदार असेल.
प्रतिस्पर्धी संघ
न्यूझीलंड : ब्रॅन्डन मॅक्क्युलम (कर्णधार), डग ब्रेसवेल, इयान बटलर, ग्रँट ईलियट, जेम्स फ्रँकलिन, मार्टिन गप्तील, मिचेल मॅकक्लिनॅघन, नॅथन मॅक्क्युलम, कायले मिल्स, कॉलिन मन्रो, ल्युक रोंची, टिम साऊदी, रॉस टेलर, डॅनियल व्हेटोरी, केन विल्यम्सन.
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), दिनेश चंडिमल, दिलहारा लोकुहेटिगे, तिलकरत्ने दिलशान, शमिंदा ईरंगा, रंगना हेराथ, महेला जयवर्धने, न्यूवान कुलसेकरा, लसिथ मलिंगा, जीवन मेंडिस, कुसल परेरा, थिसारा परेरा, कुमार संगकारा, सचित्र सेनानायके आणि लाहिरू थिरीमाने.
सामन्याची वेळ : दुपारी ३ वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : ‘स्टार क्रिकेट’ आणि ‘स्टार स्पोर्ट्स-२’