अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या आयपीएल २०२१च्या २५व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायडर्सला ७ गड्यांनी धूळ चारली. यात दिल्लीकडून पृथ्वी शॉने ८२ धावांची स्फोटक खेळी करत कोलकाताच्या गोलंदाजांची धुलाई केली. डावाच्या पहिल्याच षटकात पृथ्वीने ६ चौकार ठोकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जलदगती गोलंदाज शिवम मावीला पृथ्वीने हे चौकार ठोकले. मावी हा पृथ्वीचा मित्र आहे, या दोघांनी एकाच वर्ल्डकपमध्ये सामने खेळले होते. त्यामुळे मित्रानेच आपल्याविरुद्ध हा पराक्रम केल्यामुळे मावीने सामन्यानंतर पृथ्वीची मजा-मस्करीमध्ये मान धरली. या दोघांच्या मैत्रीचा हा व्हिडिओ आयपीएलने ट्विटरवर शेअर केला आहे. सामना संपला, की मैत्री जागा घेते, असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे.

 

पृथ्वीआधी अजिंक्य…

पृथ्वीने कोलकाताविरुद्ध १८ चेंडूत अर्धशतक ठोकले. यंदाच्या हंगामातील हे वेगवान अर्धशतक ठरले. त्याने शिखर धवनसह पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये दिल्लीने बिनबाद ६७ धावा फलकावर लावल्या. यंदाच्या हंगामातील या पॉवरप्लेमधील सर्वाधिक धावा ठरल्या. पृथ्वीपूर्वी त्याच्याच संघाच्या आणि मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणेने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना एका षटकात ६ चौकार ठोकले होते. २०१२च्या हंगामात बंगळुरूचा जलदगती गोलंदाज श्रीनाथ अरविंदविरुद्ध रहाणेने हा कारनामा केला होता. या सामन्यात रहाणेने ६० चेंडूत १०३ धावांची नाबाद खेळी केली होती.

असा रंगला सामना…

सलामीवीर मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉने केलेल्या वादळी खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायडर्सवर ७ गडी राखून विजय नोंदवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीसमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. शुबमन गिलची चांगली सलामी आणि डावाच्या उत्तरार्धात स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने केलेल्या वादळी खेळीमुळे कोलकाताला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. प्रत्युत्तरात दिल्लीने १६.३ षटकातच विजय साकारला. दिल्लीकडून पृथ्वीने ४१ चेंडूत तब्बल ११ चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावांची खेळी करत संघाचा विजय सोपा केला. त्याने डावाच्या पहिल्याच षटकात कोलकाताचा वेगवान गोलंदाज शिवम मावीला ६ चौकार ठोकले. पृथ्वीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याच्याव्यतिरिक्त सलामीवीर शिखर धवनने ४ चौकार आणि एका षटकारासह ४६ धावांची खेळी केली.

 

मराठीतील सर्व आयपीएल २०२१ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kkr bowler shivam mavi did fun with prithvi shaw after get hit six fours in over adn
First published on: 30-04-2021 at 00:03 IST