नवी दिल्ली : भारतीय संघाला अद्याप चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीचा तिढा सोडवता आला नसला तरी विश्वचषक संघातील राखीव सलामीवीर लोकेश राहुल हाच चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणार असल्याचे संकेत त्याने दिले आहेत.

विजय शंकर की लोकेश राहुल चौथ्या क्रमांकाचे पर्याय असतील, यावर सध्या भारतीय संघात बरीच खलबते होत असली तरी राहुल मात्र कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याची तयारी करत आहे. ‘‘निवड समितीने मला तशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मी भारतीय संघाचा भाग असल्याने गरज पडल्यास, कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीला उतरण्यासाठी मी सज्ज आहे. मात्र इंग्लंडमधील वातावरण पाहूनच याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे,’’ असे राहुलने सांगितले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत सुमार कामगिरी करणाऱ्या राहुलने इंडियन प्रीमियर लीगमध्ये ५९३ धावा फटकावल्या. ‘‘फलंदाजीत काही वेळेस सूर सापडत नाही. मात्र एकदा सूर सापडला की त्याच्याकडून चांगलीच कामगिरी होते. गेल्या काही महिन्यांपासून मी फलंदाजीत योगदान देत आहे. इंग्लंड लायन्सविरुद्धच्या मालिकेदरम्यान मला माझ्या कौशल्यावर, कामगिरीवर लक्ष देण्यास वेळ मिळाला. आता मी पूर्णपणे आत्मविश्वासात आहे. माझ्या फलंदाजी तंत्राबाबत सध्या कोणताही आक्षेप नाही,’’ असेही राहुलने सांगितले.

इंग्लंड दौऱ्यात भारत अ संघाकडून खेळताना प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी राहुलला तंत्रात फार बदल न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावर राहुल म्हणाला, ‘‘प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. तांत्रिकदृष्टय़ा मी सहजतेने फलंदाजी करण्यावर भर दिला. तुम्ही चेंडूला योग्य दिशेने टोलावत असता, त्या वेळी तुम्हाला सूर गवसला, असे सर्वच म्हणतात. पण जेव्हा चेंडू आणि बॅटचा नीट समन्वय होत नाही, तेव्हा तुम्हाला तंत्रात बदल करण्याची आवश्यकता आहे, असा सल्ला अनेक जण देतात. पण मी माझ्या तंत्रात फारसे बदल केले नाहीत.’’