भारतीय क्रिकेट संघ बुधवारी नव नियुक्त प्रशिक्षकांसोबत श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाला. या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचे विमान उशीरा टेऑफ झाले. विमान सेवेतील या अडथळ्यानंतरही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसह भारतीय खेळाडूंनी हास्यकल्लोळ आणि आनंदी वातावरणात दौऱ्याला सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. विमान उड्डानास उशीर झाल्यानंतर मनात राग निर्माण न करता हा वेळ आनंदी कसा घालवता येईल, याचे उदाहरण देण्याचा प्रयत्न विराट ब्रिगेडने केलाय. नियोजित वेळेपेक्षा विमान उड्डाण झाले नाही तर प्रवासाची सुरुवात खराब झाली, असा समज होणे स्वाभाविक आहे. पण विराटला तसे काही वाटत नाही. विमानसेवेतील निर्माण झालेला अडथळा हा आनंदाची आणखी एक संधी घेऊन येतो, असे विराट मानतो. त्याने स्वत: त्याचा अनुभव शेअर करुन प्रवासादरम्यान त्रास करुन घेण्यापेक्षा आनंद शोधा, असा संदेश दिलाय. श्रीलंका दौऱ्यावर रवाना होत असताना विमान उड्डाणास झालेल्या उशीरामुळे मिळालेला वेळ त्याने सहकारी खेळाडू लोकेश राहुलसोबत घालविला. त्याच्यासोबत सेल्फी घेत त्याने श्रीलंका दौऱ्याला सुरुवात केली.

विराट कोहलीने ट्विटर अकाऊंटवरुन के राहुलसोबतचा फोटो शेअर केला आहे. विमानाला झालेला उशीर हा सेल्फी घेण्यासाठी मिळालेली संधी असते, असे कॅप्शनही त्याने या फोटोला दिले आहे. भारतीय संघातील इतर खेळाडू देखील कर्णधाराचे अनुकरण करताना दिसले. शिखर धवनने देखील त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन विमानातील फोटो शेअर केले आहेत. यात भारतीय संघातून बऱ्याच दिवसांपासून बाहेर असणारा इशांत शर्माचा देखील समावेश आहे. इशांतने भुवनेश्वर कुमारसोबत इन्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावरील एकदिवसी मालिका विजयानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर दाखल झाला आहे. या दौऱ्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन कसोटी, पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसह एक टि-२० सामना खेळवण्यात येणार आहे.